नगर : ‘शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी आपण लक्ष घालू,’ असे आश्वासन देतानाच नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी ग्रामसभांना यापुढे पोलीस अधिकारी उपस्थित राहतील, पोलीस व नागरिक सुसंवाद मेळाव्याचे आयोजन ग्रामीण भागातही केले जाईल, दरोडे-जबरी चोऱ्या यासारख्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींसाठी आत्मसमर्पण योजनेचा प्रयोग राबवणार असल्याचेही सांगितले.
पोलीस महानिरीक्षक डॉ. शेखर यांच्या पुढाकाराने पोलीस नागरिक स्नेहमेळाव्याचे आयोजन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत काल, सोमवारी सायंकाळी नगरमध्ये करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. शेखर बोलत होते. मेळाव्यासाठी राजकीय पदाधिकारी वगळून शहरातील विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिकांना निमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी डॉ. शेखर म्हणाले, असा स्नेहमेळावा पोलिसांच्या चुका सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. मात्र नागरिकांनीही जबाबदारीने प्रतिसाद द्यायला हवा. कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिसांच्या कामात चांगल्या लोकांचाही सहभाग हवा. नगर जिल्ह्यात पाच हजार २०० ग्रामरक्षक तयार करण्यात आले. त्यांचा महामेळावा नगरमध्ये घेतला जाईल.
हजारे म्हणाले, की असे मेळावे प्रत्येक जिल्ह्यात व्हावेत. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न समोर येतात, विचारांची देवाणघेवाण होते, त्यातून कायदा-सुव्यवस्था निर्माण होण्यास मदत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी आभार मानले. यावेळी भूपाली निसळ, अर्शद शेख, महेंद्र कुलकर्णी, राजेंद्र कटारिया, किशोर मुनोत, सुधीर लंके, डॉ. अनील आठरे, स्वप्निल मुनोत, नरेंद्र फिरोदिया, अशोक सोनवणे यांनी विविध सूचना केल्या. सुभाष सोनवणे यांनी कविता सादर केली.
नागरिकांच्या विविध सूचना
नगर शहरातील वाहतूक समस्या सोडवावी, रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने, बेवारस वाहने उभी केली जातात, जिल्ह्यातील वाढती वाळुतस्करी त्यातून वाढणारी गुन्हेगारी, त्यांना मिळणारे राजकीय पाठबळ यावर नियंत्रण ठेवावे, नगर शहर व परिसरात चित्रपट, वेबसिरीजचे छायाचित्रणाची संख्या वाढल्याने त्याच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना राबवावी, एमआयडीसीमध्ये आणखी एक पोलीस चौकी सुरू करावी, ग्रामीण भागात पोलिसांकडून असणाऱ्या अपेक्षांबद्दल एक ग्रामसभा आयोजित करावी, पोलीस नागरिक सुसंवाद स्नेहमेळावा दर दोन-चार महिन्यांनी आयोजित केला जावा, अशा सूचना नागरिकांनी केल्या. या सूचनांची दखल घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन डॉ. शेखर यांनी दिले.