वेडाच्या भरात पोटच्या मुलाने जन्मदात्या वृद्ध पित्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने प्रहार करून त्याचा खून केला व नंतर स्वत: आत्महत्या केल्याची घटना सांगोला तालुक्यातील वाणी चिंचोळी गावात घडली.
मशिखान विष्णू गडहिरे (६०) असे खून झालेल्या वृद्ध पित्याचे नाव आहे. तर त्यांचा खून केल्यानंतर आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव हणमंत गडहिरे (२९) असे आहे. वाणी चिंचोळी गावात गडहिरे कुटुंबीय राहतात. मृत मशिखान गडहिरे यांना पत्नीसह तीन मुले आहेत. तीन मुलांपैकी हणमंतचा अपवाद वगळता इतर दोन मुलांचे लग्न झाले आहे. औद्योगिक प्रशिक्षण घेणाऱ्या हणमंत यास अधूनमधून वेडेपणाचे झटके येत असत. त्याच्यावर सोलापुरात मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार चालू होते. दरम्यान, औद्योगिक प्रशिक्षण घेतल्यानंतर नोकरी नसल्यामुळे तो वडिलांच्या हाताखाली गवंडी काम करीत असे. गेल्या काही महिन्यांपासून आपलेही लग्न व्हावे म्हणून हणमंत हा वडिलांबरोबर वाद घालत होता. त्यासाठी वडिलांनी वधूसंशोधन सुरू केले होते. तथापि, दुपारी वडील मशिखान हे घरात झोपले असताना अचानकपणे मुलगा हणमंत याने त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने प्रहार केले. यात ते जागीच मृत्युमुखी पडले. त्यानंतर हणमंत यानेही विलंब न लावता घरातील पत्र्याच्या वाशाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भात सांगोला पोलीस अधिक तपास करीत आहेत.