शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे असले तरी शिवसेनेचे उमेदवार माजी मंत्री बबनराव घोलप यांनी माजी खासदार बाळासाहेब विखे व कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांना लक्ष केले आहे. आता विरोधकांबरोबरच राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही विखे हेच टार्गेट केले असून, अद्याप त्यांनी प्रचाराला प्रारंभ केला नाही. त्यामुळे आता मुंबईत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन निर्णय केला जाणार आहे.
नेवासे मतदारसंघात आमदार शंकर गडाख यांच्या विरोधात बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाकचौरे यांच्यासह अन्य विखे समर्थक आहेत. सेना-भाजपबरोबर त्यांची जवळीक असून अनेकदा ते व्यासपीठावरही एकत्र असतात. मुरकुटे व वाकचौरे यांना काँग्रेसच्या माध्यमातून विखे रसद पुरवतात. आता विखे समर्थक उमेदवारांचा प्रचार करताना राष्ट्रवादीपुढे पेच निर्माण झाला आहे. मुरकुटे व वाकचौरे यांनी एका व्यासपीठावर येण्यास विरोध दर्शविला होता. आगामी विधानसभा निवडणुकीचीही भूमिका त्यांनी स्पष्ट केली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत नाराजी आहे. माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीच्या वेळी या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर मंत्री विखे यांनी मुरकुटे, वाकचौरे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. पण विधानसभेसंबंधी कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही.
कोपरगाव तालुक्यात राष्ट्रवादीचे माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे समर्थक अद्याप वाकचौरे यांच्या प्रचारास सक्रिय झालेले नाहीत. विखे समर्थक राजेश परजणे, राजेंद्र जाधव, काका कोयटे यांनी विधानसभेत पराभव घडवून आणला, असे कोल्हे यांचे म्हणणे आहे. आज प्रचाराला जुंपायचे अन् विधानसभेत पाडायचे हा खेळ पुन्हा होण्याची शक्यता असल्याने आजच भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली जात आहे. श्रीरामपूर तालुक्यात माजी आमदार भानुदास मुरकुटे व राहुरी तालुक्यात माजी आमदार प्रसाद तनपुरे हेदेखील सक्रिय झालेले नाहीत. आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे ते अकोल्यात सक्रिय आहेत. त्यांनी राष्ट्रवादींच्या नेत्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण त्याला कोणी दाद दिली नाही. पिचड यांचा विखे व थोरात यांच्याशी छुपा समझोता आहे. त्यामुळे आता त्यांच्या भूमिकेला समर्थन देण्यास नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
 असून अडचण, नसून खोळंबा
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी नाराजी दूर करत राजळे यांच्या प्रचारात सहभाग घेतला. पण आता ते असून अडचण व नसून खोळंबा बनले आहेत. पाचपुते यांच्या साईकृपा साखर कारखान्याने राहुरीच्या शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत. त्याचा फटका वाकचौरे व राजळे यांना बसू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित पैसे अदा करण्याचे आदेश राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाचपुते यांना द्यावेत अशी मागणी राष्ट्रवादीतूनच होत आहे.