अमरावती : ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झालेल्या अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर अकोला ते मुर्तिजापूर दरम्यान सोमवारी सकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेने एका नीलगायीचा मृत्यू झाला. यापुर्वी राष्ट्रीय महामार्गावर अनेक वन्यप्राणी ठार झाले आहेत, पण डांबरीकरण झाल्यानंतर पहिल्यांदाच एका वन्यजीवाचा बळी गेला आहे.

राष्ट्रीय महामार्ग ५६ वरील अमरावती ते अकोलादरम्यान १०७ तासांत ७५ किलोमीटर ‘बिटुमिनस काँक्रिट’रस्ते बांधणीच्या कामाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आली. याविषयी आनंदही व्यक्त करण्यात आला. डांबरीकरण झाल्याने या महामार्गावर आता वाहनांचा वेग वाढला. त्याचे दुष्पमरिणाम आता दिसू लागले आहेत. अकोला ते मुर्तिजापूर दरम्यान सकाळी एक नीलगाय मृतावस्थेत आढळून आली. नीलगाय रस्ता ओलांडत असताना अज्ञात भरधाव वेगाने धडक दिली असावी, असा अंदाज आहे. अकोला वनविभागाला या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

या भागात नीलगाय, काळविट तसेच इतरही काही वन्यप्राण्यांचा वावर आहे. रस्ता ओलांडताना यापुर्वीही अनेक वन्यप्राण्यांचे बळी गेले आहेत. यावर उपाययोजना व्हायला हवी, असे मत राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे यांनी व्यक्त केले आहे.