अहिल्यानगरःपुण्यातील स्वारगेट स्थानकावरील घटनेनंतर एसटी महामंडळाने सर्वच आगार व बस स्थानकांचे सुरक्षाविषयक ‘ऑडिट’ करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अहिल्यानगर विभागाचा पाहणी अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यात आला असून या ‘ऑडिट’मध्ये ३३ पैकी १७ बसस्थानकांत अनेक सुरक्षाविषयक त्रुटी आढळून आल्या आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील एसटी महामंडळाचे ३३ स्थानके व ११ आगार आहेत. त्याची सुरक्षाविषयक पाहणी करून अहवाल पाठवण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. यावेळी सुरक्षा व दक्षता अधिकारी धर्मराज पाटील व सांख्यिकी अधिकारी श्रीमती दिकोंडा उपस्थित होते. स्वारगेट येथील घटनेनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही जिल्ह्यातील एसटी महामंडळाची बैठक घेऊन सूचना केल्या होत्या.

जिल्ह्यातील ३३ बसस्थानक व ११ आगारात अनाक ठिकाणी रात्रीच्या वेळी अपुरी प्रकाश व्यवस्था आढळून आली. ११ ठिकाणची आगार असलेली स्थानके व अहिल्यानगर शहरातील तारकपूर, स्वस्तिक व माळीवाडा तसेच शिर्डी अशा चार स्थानकात सुरक्षारक्षक तैनात आहेत. उर्वरित १७ स्थानकांमध्ये सुरक्षारक्षक नाहीत.

सर्व ठिकाणी सीसीटीव्ही बसवले असले तरी अनेक ठिकाणी सीसीटीव्हीचे अँगल चुकीचे बसवले गेले आहेत. स्थानकाऐवजी वेगळ्याच ठिकाणीच्या घडामोडी त्यामध्ये चित्रीत होतात. काही स्थानके छोटी आहेत. तेथे नियंत्रकाची नियुक्ती नाही किंवा रात्री मुक्कामाच्या एसटी बसही थांबत नाहीत. त्यामुळे या स्थानकांच्या इमारतीसाठी सुरक्षा व्यवस्था नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही प्रमुख स्थानकांमध्ये पोलीस चौकी असल्या तरी तेथे पोलीस उपस्थित नसतात. काही स्थानकातून काही ठराविक वेळीच पोलीस उपस्थित असतात. स्वारगेट स्थानकातील घटना एसटी बसमध्ये घडली. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर विभागातील ११ आगारामधून १५ वर्षांची मुदत संपून गेलेल्या, भंगारमध्ये (स्क्रॅप) काढलेल्या ९ एसटी बसेस लिलावाच्या प्रतीक्षेत उभ्या आहेत. ज्या स्थानक व आगारांमधून पुरेशी प्रकाश व्यवस्था नाही, तिथे तातडीने व्यवस्था करण्याची सूचना देण्यात आल्याचे सुरक्षा व दक्षता अधिकारी पाटील यांनी सांगितले.