अहिल्यानगर : नगर महापालिकेसह जिल्ह्यातील १२ नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेचे वेळापत्रक राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने जाहीर केले आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर प्रारूप प्रभाग रचना १५ जुलैला तर अंतिम प्रभाग रचना २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान प्रसिद्ध केली जाणार आहे.

कालच, बुधवारी राज्य सरकारने प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले होते. त्याचे वेळापत्रक आज, गुरूवारी जाहीर करण्यात आले आहे. जिल्ह्यात नगर शहराची महापालिका तसेच नेवासे नगरपंचायत व कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, राहता, शिर्डी, देवळाली प्रवरा, राहुरी, पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा व जामखेड या नगरपरिषदांच्या निवडणुका प्रतीक्षेत आहेत. त्यांची मुदत संपलेली आहे. सध्या जिल्ह्यात अकोले, कर्जत व पारनेर या तीन नगरपंचायती अस्तित्वात आहेत.

नगरविकास विभागाच्या वेळापत्रकानुसार गटांची मांडणी १६ जूनपर्यंत, १८ जूनपर्यंत प्रभाग रचना तयार करणे, स्थळ पाहणी २३ जूनपर्यंत, प्रारूप प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या (जिल्हाधिकारी) अधिकाऱ्यांकडे ८ जुलैपर्यंत पाठवणे, प्रारूप प्रभाग रचना २५ जुलैपर्यंत प्रसिद्ध करून त्यावर २१ जुलैपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत. या हरकतींवर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ३१ जुलैपर्यंत सुनावणी घेतली जाईल व ही प्रभाग रचना निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी ७ ऑगस्टपर्यंत पाठवायची आहे. राज्य निवडणूक आयोग प्रभाग अंतिम प्रभाग रचना २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान जाहीर करेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनामध्ये ७ जणांची समिती

महापालिकेत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची समिती प्रभाग रचनेसाठी नियुक्त करण्यात आली आहे. या समितीने कामकाज सुरू केले आहे. या समितीमध्ये उपायुक्त, नगररचनाचे सहाय्यक संचालक, नगररचनाकार, जनगणना अधिकारी, संगणक तज्ज्ञ व नगररचना कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जनगणनेचे प्रगणक गट करणे, संगणकावर नकाशा तयार करणे, प्रभागाच्या हद्दी तपासणी यासह २४ दिवसात प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करावयाची आहे. याच प्रकारे नगरपंचायत व नगरपरिषद यामध्येही मुख्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाईल.