शेतकऱयांनी खासगी सावकारांकडून घेतलेले कर्ज राज्य सरकार फेडणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी केली. दुष्काळग्रस्त शेतकऱयांसाठी ३९२५ कोटींचे पॅकेज राज्य सरकारकडून नागपूर अधिवेशनात जाहीर करण्यात आले. तसेच पीक कर्जाचे व्याजदेखील सरकार भरणार आहे.
विशेषत: विदर्भ व मराठवाडा भागातील शेतकऱ्यांची सप्टेंबर तिमाहीची तीन महिन्यांची वीज बिले पूर्ण माफ करण्याचा, तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना चालू वर्षाचे कर्ज असले तरी देखील मदत करण्याचा असे महत्वपूर्ण निर्णय विधानसभेमध्ये फडणवीस यांनी जाहीर केले. अशाप्रकारे एकूण मिळून सात हजार कोटींचे दुष्काळी पॅकेज राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.
राज्यात पाच लाख शेतकरी सावकारी कर्जात आहेत. दुष्काळाचे संकट असताना सावकाराच्या अवाजवी व्याज आकारणीने शेतकरी आणखी खचला जातो. त्यामुळे राज्यातील सावकारी कर्ज घेतलेल्या पाच लाख शेतकऱयांचे कर्ज माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही घेतला असून, पीक कर्जाचे व्याजदेखील सरकार भरणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसचे राज्य सावकार मुक्त करण्याचीही घोषणा फडणवीस यांनी केली.
दरम्यान, राज्यातील दुष्काळ मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पोहोचला असून, १४ आणि १५ डिसेंबरला केंद्रीय पथक दुष्काळाच्या पाहणीसाठी राज्यात येणार असल्याही माहिती फडणवीस यांनी दिली. तसेच ही विधानसभा शेतकऱयांच्या पाठीशी उभी आहे, थोडा वेळ द्या, निराशेतून बाहेर या, असे आवाहन देखील फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱयांना केले.