सत्तेसाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करणारे राजकारणी त्यांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी मात्र मुळीच पुढे येत नसल्याबद्दल खंत व्यक्त करून ही बाब यापुढे अजिबात खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा शिवरायांचे तेरावे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी रविवारी रात्री दाभाडी येथे आयोजित शिवप्रेमी मेळाव्यात दिला. शिवाजी महाराजांचा केवळ जयजयकार करून चालणार नाही, तर त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज असून, त्याच दृष्टिकोनातून बहुजन समाजाचे दु:ख जाणून घेण्यासाठी २३ नोव्हेंबरपासून आपण राज्यव्यापी दौरा करणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.
मराठा महासंघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, छावा आदी संघटनांच्या वतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक उभारण्याच्या कामात होणाऱ्या दिरंगाईबद्दल बोलताना त्यांनी जर हे स्मारक झाले तर जगामध्ये शिवरायांच्या कर्तृत्वाचा एक चांगला संदेश जाईल, असे नमूद केले. आपण करणार असलेल्या राज्य दौऱ्यामागे कोणताही राजकीय हेतू नाही किंवा त्यात कोणतीही स्टंटबाजी करण्याचा आपला प्रयत्न नसल्याचे नमूद करून सर्वाचे प्रश्न जाणून घेण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.