चोरून आणलेली खासगी ट्रॅव्हल्स बस भरधाव निघालेल्या चालकाचा पाठलाग करून थांबवण्याचा प्रयत्न दुचाकीवरील तरुणांनी केला. मात्र, दुचाकीला धडक देऊन बस पुढे निघून गेली. यात एक ठार व अन्य दोघे जखमी झाले.
पाटोदा येथे शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास बसस्थानकाच्या बाजूला लोक उभे होते. या वेळी पांढऱ्या रंगाची बस भरधाव आली. बस धडकणार हे पाहून लोक बाजूला झाले. या वेळी बस वेगाने तशीच पुढे गेली. मात्र, जीपमधून काही तरुण तिचा पाठलाग करीत असल्याचे दिसून आले. याच वेळी पाटोद्यातील तिघा तरुणांनी दुचाकीवरून या गाडीचा पाठलाग सुरू केला. परंतु गाडीचा वेग जास्त होता. दुचाकीवरील तरुणांनी तांबा राजुरीजवळ गाडीला गाठून तिच्यासमोर दुचाकी उभी केली. मात्र, चालकाने दुचाकीला उडवले. यात शेख गफार नूर (वय २२) याचा मृत्यू झाला, तर शेख तौशीब व शेख असीर हे दोघे गंभीर जखमी झाले.
एमएच १२ डीसी ८५५१ ही ट्रॅव्हल्स बस थोडय़ा अंतरावर उभी करून चालक पसार झाला. ही बस जामखेड तालुक्यातील नायगाव नावेली येथील तरुणाने पुण्याच्या कंपनीतून चोरी करून आणल्याचे उघड झाले. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.