दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारकडे बसून तातडीने पसे आणावेत. १५ डिसेंबरची वाट कशाला बघता, असा सवाल करतानाच मराठवाडय़ाच्या दुष्काळ पाहणीचे नाटक सरकारने थांबवावे आणि केंद्र सरकारकडे ठाण मांडून महाराष्ट्रासाठी तातडीने मदत मागवून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा अन्यथा हिवाळी अधिवेशन चालवू देणार नाही, असा सडेतोड इशारा शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी येथे दिला.
लातूर जिल्हय़ातील उजनी, आशीव, हासेगाववाडी आदी परिसरास शिवसेना शिष्टमंडळाने भेट दिली. आमदार दिवाकर रावते, विजय शिवदारे, कृष्णा घोडा, ज्ञानराज चौगुले, शांताराम मोरे, बालाजी किनीकर उपस्थित होते. पत्रकार बैठकीत कदम म्हणाले, की काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारवर विविध प्रश्नी हल्ला चढवणारे फडणवीस व खडसे आता सत्तेत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावर सरकारवर खुनाचा खटला दाखल करण्याचा इशारा या मंडळींनी दिला होता. गेल्या दहा महिन्यांत मराठवाडय़ात ३६० जणांनी आत्महत्या केल्या. मराठवाडय़ात होत असलेल्या आत्महत्यांबाबत सरकारविरोधात खटले दाखल का करू नयेत, असा सवाल कदम यांनी उपस्थित केला.
खडसे यांना मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर वेळ वाया घालवण्याऐवजी मंत्रालयात बसूनही माहिती घेता आली असती. ब्रिटिशांच्या काळातील कायद्यानुसार केवळ कागदी घोडे नाचवण्यात वेळ घालवला, तर मराठवाडय़ात आणखी आत्महत्या होतील. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सरकारने या बाबत पावले न उचलल्यास हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा कदम यांनी दिला.
लातूर जिल्हय़ातील हासेगाववाडी व कोनाळी या ठिकाणच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शिवसेनेच्या वतीने प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली. मोदी सरकारने मुंबई मेट्रोसाठी ४२ हजार कोटी व मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी ४० हजार कोटी देऊ केले आहेत, ही बाब चांगली आहे. मराठवाडय़ाच्या दुष्काळासाठीही त्यांनी तातडीने मदत दिली पाहिजे. फिजी सरकारला मोदींनी ६०० कोटी दिले. मराठवाडय़ासाठी त्यांनी तातडीने पसे दिले पाहिजेत, अशी मागणी कदम यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stop drama drought survey
First published on: 25-11-2014 at 01:57 IST