मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहनचालकांवर अपघातांची टांगती तलवार

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील उड्डाणपुलांखाली मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून रस्त्यांवरील वाहनचालकांच्या डोक्यावर कायम अपघाताची टांगती तलवार असते. रात्रीच्या वेळी गुरे मध्ये आल्याने अनेकदा अपघात घडले आहेत. मोकाट जनावरांचा बंदोबस्त लावण्यासाठी आयआरबी प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

महामार्गावरील विविध उड्डाणपुलांखाली, रस्त्यावर ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणात मोकाट जनावरे कळपाने फिरत आहेत. काही जनावरे रस्त्याच्या मध्यभागी बसत आहेत. यामुळे रहदारीस मोठय़ा प्रमाणात अडथळा निर्माण होतो. अनेकदा अचानक मोकाट जनावर रस्ता ओलांडत असल्याने अपघात होत आहेत, तर वाहतूक कोंडीचा त्रास होत असल्याने नागरिक संतप्त होत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अत्यंत वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील उड्डाणपुलांखाली गेल्या काही महिन्यांपासून मोकाट जनावरांचे वास्तव्य वाढले आहे. या ठिकाणी पथदिवेच नसल्याने रस्त्यात बसलेली जनावरे रात्रीच्या वेळी दिसत नाहीत. २० ते २५ गाईंचा कळप असल्याने त्यांना हुसकणे कठीण जाते. वाहनचालकांना अध्र्याच रस्त्याचा वापर करीत ये-जा करावी लागत असल्याने अपघात झाले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपल्या परिसरातील अशा समस्या सोडवण्यासठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र लोकप्रतिनिधींनीही या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे.

मोकाट जनावरे पुलाखाली बसत असल्याने वाहतुकीस मोठय़ा प्रमाणात अडथळा निर्माण होतो. शिवाय अपघात होण्याची भीती सतत जाणवत असते. तरी आयआरबी प्रशासनाने याबाबत योग्य कार्यवाही करणे गरजेचे आहे. – विक्रम दळवी, स्थानिक रहिवासी