गडचिरोलीमधील गोंडवाना विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षेची तयारी अग्रक्रमाने पूर्ण केली आहे. १७ हजार २२९ विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा देणार असून, ७०६ विद्यार्थी ऑफलाईन परीक्षेला बसणार आहेत. जे विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नाहीत, त्यांना १५ दिवसांत परीक्षा देता येणार आहे. तर, नापास विद्यार्थ्यांनाही संधी दिली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामंत यांनी विद्यापीठाच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना सुरक्षित परीक्षा देता यावी, यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाला काळजी घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. ऑनलाइन परीक्षा देणारे सर्व विद्यार्थी घरूनच परीक्षा देतील, त्यासाठी इंटरनेट, मोबाइलसह सर्व आवश्यक तांत्रिक बाबींचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रश्न बँक देण्यात येणार आहे. ५० टक्के अंतिम परीक्षेचे गुण व ५० टक्के अंतर्गत गुण यावरून निकाल घोषित केले जाणार आहेत. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

गोंडवाना विद्यापीठाच्या पायाभूत विकासाकरिता ६० कोटींचा निधी लवकरच मंजूर केला जाणार आहे. तसेच, विद्यापीठाने ३५ एकर जमीन अधिग्रहीत केली असुन, आणखी १५ एकर लवकरच अधिग्रहीत केली जाणार आहे. यासाठी २० कोटींचा निधी देण्यात आला असल्याची माहिती देखील सावंत यांनी दिली. विद्यापीठातील पदभरती प्रक्रीया केवळ कोविडमुळे थांबलेली आहे. आगामी काळात ती पूर्ण होऊन १२ बी ची मान्यता सुद्धा लवकरच मिळवण्यात यश येईल. विद्यापीठाच्या विकासाची प्रक्रीया केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून दोन टप्प्यात राबविली जाईल. गोंडवाना विद्यापीठ नक्कीच विकासाच्या दिशेने झेप घेईल असेही ते म्हणाले. गोंडवाना विद्यापीठ देश-विदेशातील अभ्यासकांचे आकर्षणाचे केंद्र व्हावे. आदिवासी आणि वन यासाठीचे विशेष विद्यापीठ असल्याची तरतूद करण्यासाठी कायद्यामध्ये सुधारणा करावी लागणार आहे, असे सामंत म्हणाले. पत्रपरिषदेला प्रभारी कुलगुरू डॉ.श्रीनिवास वरखेडी, प्र.कुलगुरू डॉ.भुसारी, कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले उपस्थित होते.

मॉडेल कॉलेज सुरू करणार –
गोंडवाना विद्यापीठातील मॉडेल कॉलेज सध्या बंद पडले आहे. मात्र हे बंद मॉडेल कॉलेज पून्हा सुरू केले जाणार असल्याची माहिती देखील यावेळी उदय सामंत यांनी दिली. तसेच, येथे उपसंचालक केंद्र सुद्धा सुरू करण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students who could not sit for the exam they can give the exam in 15 days uday samant msr
First published on: 14-09-2020 at 19:15 IST