कृष्णा वैद्यकीय संशोधन केंद्राचे प्रमुख अंग असलेल्या कृष्णा रूग्णालयामध्ये महिलेवर सलग ११ तास शस्त्रक्रिया करून ६ सें. मी. व्यासाची गाठ काढून, त्याजागी कृत्रिम रक्तवाहिनी जोडण्याची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. शस्त्रक्रियेनंतर सदरची रूग्ण महिला पूर्ण शुध्दीवर आली असून, तिच्या सर्व शारीरिक हालचाली पूर्ववत सुरू आहेत. रूग्णांवर मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या मानेतील मुख्य रक्तवाहिनीवरील गाठीची (कॅरॉटीड बॉडी टय़ुमर) शस्त्रक्रिया राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून झाल्याने रूग्णास कोणताही खर्च करावा लागलेला नाही.
कराड भागातील अशाप्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे. चचेगाव (ता. कराड) येथील उषाताई सुभाष पवार या ५० वर्षीय महिला रूग्णास गेली १५ वर्षे मानेच्या डाव्या बाजूस एक गाठ होती. सदरची महिला कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर ही गाठ म्हणजे मोठा कॅरॉटीड बॉडी टय़ुमर असल्याचे निदान करण्यात आले. यावर शस्त्रक्रिया हा एकच पर्याय राहिला. ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असून, काही वेळेस शस्त्रक्रियेनंतर रूग्णास अर्धागवायू होण्याची शक्यता असते. कृष्णा हॉस्पिटलमध्ये नुकत्याच रूजू झालेल्या ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ. रेखा मट्टा यांनी भूलतज्ज्ञ डॉ. धुलखेड व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. कृष्णा हॉस्पिटलचे प्रमुख विश्वस्त डॉ. सुरेश भोसले यांनी या रूग्णास भेट देऊन तिच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि डॉ. रेखा मट्टा व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. अशा प्रकारची अवघड शस्त्रक्रिया कृष्णा हॉस्पिटलमध्ये होत असल्याने परिसरातील लोकांमधून समाधान व्यक्त होत आहे.