जिल्हा ज्युदो संघटनेच्या संघातून खेळणाऱ्या तिघांनी महाराष्ट्र राज्य ज्युदो संघटना आणि सातारा शिवस्मृती ज्युदो संघटना यांच्या वतीने आयोजित ४०व्या महाराष्ट्र युवा व कनिष्ठ स्पर्धेत पदक मिळविले. स्पर्धेत २५० खेळाडूंनी सहभाग घेतला. नाशिक जिल्हा संघटनेच्या केंद्रात सराव करणाऱ्या सागर गोंधे याने युवा वर्गात ७३ किलो गटात रौप्य पदक मिळविले, तर राज डेंगळेने ५० किलोखालील वजन गटात आणि मुलींमध्ये विद्या लोहारने ४० किलो वजनी गटात कांस्य पदक मिळविले. अजिंक्य घुगे, तन्मय आरोटे, सानु पाठक यांनीही आपआपल्या गटात सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या खेळाडूंना ज्युदो मार्गदर्शक भारतीय क्रीडा प्राधिकरणचे (साई) प्रशिक्षक विजय पाटील यांसह योगेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.