Sudhir Mungantiwar on OYO Hotels: महाराष्ट्रासह देशभरातल्या अनेक पर्यटन स्थळांवर OYO या हॉटेल चेनशी संलग्न हॉटेल्स आणि लॉजिंगच्या व्यवस्था पाहायला मिळतात. अनेक पर्यटक या व्यवस्थांचा लाभही घेतात. मोठ्या शहरांमध्ये देखील अनेक हॉटेल्स OYO शी निगडित असतात. मात्र, आता महाराष्ट्राच्या विधानसभेत OYO चा उल्लेख करण्यात आला असून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. माजी मंत्री व भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा आरोप केला आहे. पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान मुनगंटीवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. या पार्श्वभूमीवर OYO हॉटेल चेन चर्चेत आली आहे. अद्याप ओयोकडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

महाराष्ट्रात किती OYO हॉटेल्स आहेत आणि त्यात नेमकं काय घडतंय, याची माहिती गृहराज्यमंत्र्यांनी घ्यायला हवी, अशी मागणी करतानाच या हॉटेल्समध्ये खोल्या एकेक तासासाठी भाड्याने मिळत असल्याचा धक्कादायक दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

“एक OYO नावाची हॉटेल चेन तयार झाली आहे. मी येताना बघितलं की शहराच्या २०-२० किलोमीटर बाहेर एका निर्जन ठिकाणी OYO हॉटेल दिसतं. मनात शंका आली की हे OYO हॉटेल चेन काय आहे. या अतिशय गंभीर बाबीकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. या OYO हॉटेलसाठी कोणत्याही ग्रामपंचायत, नगरपरिषद किंवा महानगरपालिकेची परवानगी घेतली जात नाही”, असं मुनगंटीवार विधानसभेत आपल्या भाषणादरम्यान म्हणाले.

“…तर त्या प्रवाशाचं गणित कच्चं”

“या हॉटेलमध्ये एक तासासाठी खोली भाड्याने दिली जाते. ती कशासाठी दिली जाते? हा पोलीस विभागाच्या अभ्यासाचा विषय आहे. OYO च्या हॉटेलमध्ये २०-२० किलोमीटर जाऊन कुणीही प्रवासी राहात नाही. कारण हा प्रवासी जर तिथपर्यंत जात असेल, तर त्याचं अर्थशास्त्र कच्चं आहे. कारण जाण्या-येण्याच्या टॅक्सीला जितका खर्च येतो, त्यापेक्षा शहरातल्या एका हॉटेलमध्ये राहणं जास्त परवडतं. पण ते लोक OYO मध्ये जातात”, असं गणित यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“खरंतर महाराष्ट्रात संस्कृतीरक्षकांचं सरकार आहे. इथे जर संस्कृतीचा ऱ्हास होत असेल, तर गृहराज्यमंत्र्यांनी OYO चा अभ्यास करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात किती OYO हॉटेल आहेत, याची माहिती त्यांनी देण्याची गरज आहे”, असंही त्यांनी नमूद केलं.