बीड जिल्ह्य़ातून ४ लाखांपेक्षा ऊसतोडणी मजूर राज्यातील विविध साखर कारखान्याच्या क्षेत्रात तोडणीसाठी स्थलांतरित होतात. हंगाम सुरू होण्यास अवधी असतानाही त्यांना जाणीवपूर्वक जिल्ह्य़ाबाहेर हाकलण्याचा डाव आखला जात आहे. भाजपच्या नेत्यांनी हा प्रकार घडत असल्याचा दावा केला.
 ऊसतोडणी मजुरी कराराची मुदत संपली आहे. नवीन दरवाढ व्हावी यासाठी कामगारांनी आ. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संप सुरू केला आहे.  गाळप हंगाम १५ ऑक्टोबरनंतर सुरू होईल, अशी  स्थिती आहे. ऊसतोडणी मजूर मतदानासाठी गावातच राहिले तर राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसेल, असे सांगितले जाते. या पाश्र्वभूमीवर साखर कारखानदार मंडळींनी या मजुरांना बाहेरगावी पाठवण्याचा प्रयत्न चालवला आहे. संपाबाबत कोणतीही तडजोड न झाल्याने मजुरांनी गाव सोडून जाऊ नये, असे आवाहन माजी आमदार केशव आंधळे यांनी केले आहे.
    राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांचे हे षड्यंत्र आहे. साखर संघाबरोबर १७ ऑक्टोबर रोजी मुंबईत बठक होणार आहे. या बठकीनंतर संपाचा निर्णय होईल. त्यामुळे मजुरांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता गाव सोडू नये, असे आवाहन केले आहे.