कर्ज वसुलीसाठी सोलापूर जिल्हा बँकेचा निर्णय
राष्ट्रवादीचे नेते खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याशी संबंधित करकंब (ता. पंढरपूर) येथील ‘विजय शुगर’ व बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्याशी संबंधित खामगावच्या ‘आर्यन शुगर’ या दोन्ही खासगी साखर कारखान्यांकडे असलेल्या ३८२ कोटी ६० लाखांच्या थकीत कर्जवसुलीसाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या दोन्ही साखर कारखान्यांची मालमत्ता विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोटय़वधींच्या कर्ज थकबाकीमुळे आर्थिक संकटात सापडली आहे. बहुसंख्य कर्ज थकबाकी बँकेच्या अनेक बडय़ा संचालकांशी संबंधित साखर कारखाने व शिक्षण संस्थांकडे प्रलंबित आहे. त्यामुळे सामान्य शेतक ऱ्यांना शेतीकर्ज देणे बँकेला केवळ अशक्य झाले आहे. ‘विजय शुगर’ व ‘आर्यन शुगर’कडे शेतक ऱ्यांच्या उसाची ‘एफआरपी’ची रक्कमही थकीत आहे. ही थकीत देणी शेतक ऱ्यांना अदा करण्यासाठी व बँकेची कर्ज थकबाकी वसूल करण्यासाठी दोन्ही कारखान्यांचा ताबा यापूर्वीच घेण्यात आला आहे. आता त्यांची प्रत्यक्ष विक्री करण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे.
३८२ कोटी थकीत कर्ज
बार्शीच्या ‘आर्यन शुगर’कडे कर्जाची मुद्दल १३१ कोटी, व्याज ७६ कोटी अशी एकूण २०७ कोटी २ लाखांची थकबाकी आहे. याशिवाय शेतक ऱ्यांच्या उसाच्या एफआरपीपोटी २१ कोटी १३ लाखांची रक्कम थकीत आहे. तर पंढरपूरच्या ‘विजय शुगर’कडे कर्जाची मुद्दल ११३ कोटी ६० लाख, व्याज ६० कोटी अशी एकूण १७५ कोटी ५३ लाखांची थकबाकी प्रलंबित आहे. तसेच उसाच्या एफआरपीची २० कोटी ९६ लाखांची रक्कम येणे आहे. विजय व आर्यन या दोन्ही साखर कारखान्यांच्या विक्रीसाठी त्यांचे मूल्यांकन केले जाईल. त्यानंतर विक्रीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यातून ३८२ कोटी ६० लाखांची थकीत कर्जवसुली केली जाणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी सांगितले.