ऊसदराच्या आंदोलनाचे लोण  जिल्ह्य़ात पसरले, शेवगाव मात्र शांत, दरासाठी शनिवारी बैठक

ऊसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेवगावमधील आंदोलनाला काल, बुधवारी हिंसक वळण लागून गोळीबाराची घटना घडल्यानंतर आज, गुरुवारी शेवगाव तालुक्यात शांतता होती. मात्र आंदोलनाचे लोण जिल्ह्य़ाच्या इतर भागात पसरले. ऊसभावासह इतर मागण्यांसाठी शेतकरी सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वत:सह नगरमधील प्रादेशिक साखर उपसंचालकांना कार्यालयात सुमारे तीन तास कोंडले तर राहुरीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत ऊस वाहतुकीच्या मालमोटारी अडवून धरल्या. दरम्यान ऊसभावासाठी दि. १८ रोजी (शनिवारी) नगर जिल्ह्य़ातील साखर कारखानदार व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सहसंचालकांनी बैठक आयोजित केली आहे.

शेवगावमधील गोळीबारात जखमी झालेल्या दोघा जखमींची नगरमध्ये सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांनी सकाळी भेट घेतली व हे कार्यकर्ते तडक प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या कार्यालयावर धडकले. ३ हजार ५०० रुपयांची पहिली उचल द्यावी, वजनकाटय़ात होणारी लूट थांबवावी, गाळपासाठी खोटे क्षेत्र दाखवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी, गोळीबार करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी, गोळीबारात जखमी झालेल्या दोघा शेतक ऱ्यांना प्रत्येकी १० लाखांची भरपाई द्यावी, अशी त्यांची मागणी होती. सुकाणू समितीचे कॉ. डॉ. अजित नवले, बहिरनाथ वाकळे, कालिदास अपेट, बन्सी सातपुते, बाळासाहेब पटारे, अजय बारस्कर, संतोष वाडकर, अनिल देठे, महेबूब सय्यद आदीं २५ ते ३० कार्यकर्ते कार्यालयात गेले. सहसंचालक श्रीमती संगीता डोंगरे कोपरगावला गेल्याने त्यांनी उपसंचालक राजकुमार पाटील यांना स्वत:सह कार्यालयात कोंडून घेतले. जोरदार घोषणाबाजीही केली.

सुमारे तीन तास हे आंदोलन सुरू होते. सहसंचालक डोंगरे आल्यावर पाटील यांची सुटका झाली. डोंगरे यांच्याशी झालेल्या चर्चेत ३ हजार ५०० रु. भावासाठी शनिवारी (दि. १८) नगर व नाशिक जिल्ह्य़ातील साखर कारखानदार, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्याचा, कारखान्यांचे ऊस क्षेत्र तपासणीसाठी जानेवारीपर्यंत सर्वेक्षण करून अहवालानुसार कारवाई करण्याचा, कारखान्यांवर भरारी पथकामार्फत ऊस वजनासाठी तपासणी करण्याचा निर्णय झाल्याचे वाकळे यांनी सांगितले. नंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

राहुरीत रास्ता रोको

नगर-मनमाड महामार्गावर गुहा (ता. राहुरी) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसाच्या मालमोटारी अडविल्या. सुमारे २०० मोटारींची रांग त्यामुळे लागली होती. संघटनेचे कार्यकर्ते रवी मोरे, सुनील इंगळे, अरुण डौले, आसिफ पटेल, जितेंद्र भोसले, आनंद वणे, सतीश पवार, अमोल मोढे, ज्ञानेश्वर जाधव, विशाल तारडे, रोहित बोरावके, शरद मरकड, अच्युत बोरकर, दिनेश वराळे, डॉ. विजय वाबळे यांनी अचानक गुहा गावानजीक रास्ता रोको केले.