स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वाखाली पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या ऊसदर आंदोलनाने बुधवारी दुपारी उग्र रुप धारण केले. आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेल्या कराड शहराजवळून जाणाऱया मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसेससह २० गाड्यांची तोडफोड करण्यात आली. आंदोलकांनी काही गाड्यांना आग लावली असून, बुधवारी दुपारी साडेचार वाजल्यापासून कराडनजीक या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या शेतात लपून बसलेले आंदोलक गाड्यांवर तुंबळ दगडफेक करीत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कोल्हापूर, सांगलीकडून पुण्या-मुंबईकडे जाणारी दुधाच्या आणि भाजीपाल्याच्या गाड्या आंदोलकांकडून लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे.
एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते शेतकऱय़ांना शांततामय आंदोलन करण्याचे आवाहन करीत असताना चिडलेले शेतकरी त्यांचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे दिसते आहे. बुधवारी राजू शेट्टी यांची सभा सुरू असतानाच आंदोलकांनी त्यांचे ऐकून न घेता सभास्थळी केंद्रातील नेत्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. सभेमध्ये राजू शेट्टी यांनी सरकारला या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळपासूनच ‘बंद’ केले आहेत. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील एसटी वाहतूक ‘बंद’ करण्यात आली आहे.
ऊसदराच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पंतप्रधान ड़ॉ. मनमोहन सिंग यांच्या भेटीला गेलेल्या राज्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या हाती केवळ आश्वासनांचे ‘फुटाणे’ मिळाले. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमण्याची घोषणा बैठकीवेळी करण्यात आली. पंतप्रधानांच्या बैठकीत तोडगा न मिळाल्याने कराडमध्ये सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे घेऊन ऊसदराचे आंदोलन शेतकऱयांच्या हातात दिले जाईल, यातून उदभवणाऱया परिस्थितीस राज्यकर्ते आणि साखर कारखानदार जबाबदार असतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी येथे दिले होते.