मांजरा परिवारातील कारखान्याने आपल्या सभासदांना २ हजार रुपये, किल्लारी कारखान्याने १ हजार ८०० रुपये, तर मारुतीमहाराज कारखान्याने १ हजार ४१० रुपये भाव दिला, मात्र या असमान भावाबद्दल शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे.
शेतकरी संघटनेने कारखाने सुरू होण्यापूर्वी चक्का जाम आंदोलन केले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या आंदोलनात सहभाग दिला होता. साखरेचे भाव पडल्याने उसाला योग्य भाव देता येत नसल्याची खंत कारखान्याने व्यक्त करून किमान २ हजार रुपये भाव दिला जाईल, असे आमदार दिलीपराव देशमुख यांनी जाहीर केले होते. त्यानंतर मांजरा परिवारातील कारखान्यांनी २ हजार रुपये भाव दिला. किल्लारी साखर कारखाना आमदार बसवराज पाटील मुरूमकर हे चालवतात. त्यांनी किल्लारीच्या सभासदांना १ हजार ८०० रुपये भाव दिला, मात्र औसा तालुक्यातील मारुतीमहाराज साखर कारखान्याने सभासदांना पहिला हप्ता १ हजार ४१० रुपयांचा दिला. त्यानंतर दुसरा हप्ता अजून दिला नाही. ‘मारुती’च्या सभासदांमध्ये कारखाना प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी आहे.
कारखान्याची कर्जमंजुरी अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांना किमान १ हजार ९१० ते १ हजार ९२० रुपये प्रतिटन भाव दिला जाईल. शेतकऱ्यांना ‘एफआरपी’प्रमाणे भाव न दिल्यास सरकार आमच्या कारखान्यावर कारवाई करू शकते याची आम्हाला जाणीव असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. कारखान्याने लवकर दुसरा हप्ता द्यावा, अशी मागणी सभासद करीत आहेत.