ऊसतोडणी मजुरांना मजुरीत २० टक्के वाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही वाढ मागचा करार संपला, तेव्हापासून लागू होणार आहे. मजुरीच्या कराराबाबत लवकरच लवाद निश्चित करून मजुरीबरोबरच ऊसतोडणी कामगारांच्या इतर मागण्याही प्राधान्याने सोडविण्यात येणार आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील काळाबाजार थांबविण्यासाठी महिला बचतगटांना धान्यपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी मुंडे यांनी जिल्ह्यातील दुष्काळ व गारपिटीसह विकासकामांचा आढावा घेतला. बठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुंडे म्हणाल्या की, पावसाअभावी दुष्काळी स्थितीला तोंड देत असलेल्या शेतकऱ्यांसमोर अवकाळी पावसाचे संकट उभे ठाकले. यातून बाहेर पडण्यापूर्वीच दोन दिवसांपासून गारपीट होत आहे. नसíगक आपत्तीच्या दुष्टचक्रात शेतकरी सापडला असून, ५ महिन्यांपूर्वीच सत्तेवर आलेले सरकार शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. खरीप नुकसानभरपाईचा ८० टक्के निधी शेतकऱ्यांना मिळाला. २० टक्के निधी शेतकऱ्यांचे बँकेत खाती नसल्यामुळे राहिला. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या फळबाग व पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनाही मदत दिली जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर कारखानदारीसाठी दोन हजार कोटी रुपये कर्ज मदतीची घोषणा करतानाच ऊसतोडणी मजुरांनाही २० टक्के मजुरीत दरवाढ देण्याचा निर्णय घेतला.
यंदाच्या गळीत हंगामापूर्वी मागच्या वेळी झालेला मजुरीचा करार संपला. पण एकूण दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन मजुरांनीही सामंजस्याची भूमिका घेतली. आपल्या शब्दावर आंदोलन मागे घेतले. त्यामुळे येत्या काही दिवसांत लवाद निश्चित करून मजुरीच्या दरवाढीबरोबरच इतर मागण्याही प्राधान्याने सोडवल्या जातील. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत धान्यातील काळाबाजार थांबवण्यासाठी वाहतुकीचे काम बचतगटांना देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अंतर्गत मोठय़ा प्रमाणात काम सुरू आहे. या कामात गुणवत्ता महत्त्वाची असून बनवेगिरी करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारांविरुध्द थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नावरही लवकरच मार्ग काढण्याची ग्वाही देताना शिक्षकांच्या बदल्यांबाबत राज्यस्तरावर धोरणात्मक निर्णय होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘अवकाळी पावसाची शिकार होताना वाचले’
गेल्या ५ दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीट सुरू आहे. रविवारी हेलिकॉप्टरने येत असताना वडवणी परिसरात मोठय़ा प्रमाणात गारपीट सुरू झाली. परिणामी आपले हेलिकॉप्टर काही काळ भरकटले. त्यामुळे या आपत्तीत मीच शिकार होताना वाचले, असे सांगून जिल्ह्यात पाचजणांचा मृत्यू, तर १५ लोक जखमी झाल्याची माहिती मुंडे यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 14th Apr 2015 रोजी प्रकाशित
‘ऊसतोडणी मजुरांना २० टक्के वाढ देणार’
ऊसतोडणी मजुरांना मजुरीत २० टक्के वाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही वाढ मागचा करार संपला, तेव्हापासून लागू होणार आहे.
First published on: 14-04-2015 at 01:56 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sugarcane workman 20 increase