सुमित्रा महाजन यांचे वक्तव्य
सरसंघचालक मोहन भागवत यांच्यापाठोपाठ आता लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही जाती आधारित आरक्षणावर फेरविचार करण्याची आवश्यकता बोलून दाखविली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील आरक्षणाच्या फेरविचाराला पाठिंबा दिला होता. परंतु, प्रत्यक्षात तसे काही घडले नसल्याचे महाजन यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी अभियानअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींचा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात महाजन यांनी आरक्षणाबाबतचे वक्तव्य केले. त्या म्हणाल्या की, आरक्षण दहा वर्षांसाठी असावे आणि त्यानंतर आरक्षणाचा फेरविचार व्हावा, असे आंबेडकर यांचे मत होते. पण, आपण यासंदर्भात काहीच केले नाही. या वेळी त्यांनी त्यांचे व्हिएतनाममधील अनुभवदेखील सांगितले. त्यांची प्रगती पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. आपण मात्र स्वातंत्र्यानंतर साठ-सत्तर वर्षांनीदेखील जातिभेद मिटवू शकलेलो नाही, असे महाजन या वेळी म्हणाल्या.
यापूर्वी भागवत यांनी आरक्षणाच्या धोरणाचा फेरविचार करण्याचे मत व्यक्त केल्यानंतर देशात मोठा गदारोळ माजला होता. बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या वक्तव्याचा फटका भाजपला बसल्याचे मत राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केले होते.