भाजप महानगर प्रमुखाची तक्रार
गुजरात पोलिसांनी येथे पकडलेल्या गोध्रा हत्याकांडातील फरार संशयीत इमरान अहमद ऊर्फ शेरूला एमआयएमच्या स्थानिक नेत्याने आश्रय दिला तसेच या काळात काही पोलिसांशीही त्याने घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले होते, असा आरोप भाजपचे महानगरप्रमुख सुनील गायकवाड यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. गोध्रा हत्याकांडासारख्या गंभीर गुन्ह्य़ातील संशयिताचे शहरात सात-आठ वर्षे वास्तव्य असणे हे गंभीर प्रकरण असून त्याची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी गायकवाड यांनी केली.
२००२ मधील गोध्रा हत्याकांडप्रकरणी तेथील रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल झालेल्यांपैकी एक प्रमुख संशयित इमरान हा तेव्हापासून फरार होता. गुजरात पोलीस त्याच्या शोधात होते. अखेरीस मालेगाव शहरात त्याचे वास्तव्य असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर गुजरात पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने १२ जुलै रोजी आझाद नगर भागातून त्याला अटक केली. इमरान हा सात-आठ वर्षांपासून येथे वास्तव्यास असल्याचे तसेच तत्पूर्वी काही वर्षे त्याचे धुळ्यात वास्तव्य असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. इमरानसारख्या संशयिताचे इतकी वर्षे शहरात बिनदिक्कतपणे वास्तव्य असण्याच्या प्रकारामुळे काही प्रश्न निर्माण झाले तसेच शहरवासियांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या संशयितास राजकीय आश्रय मिळाल्याचा तसेच त्याचे काही पोलिसांशी संबंध होते, असा आरोप गायकवाड यांनी केल्यामुळे या प्रकरणातील गांभीर्य वाढले आहे.
इमरान हा शहरातील वाळू माफियांमध्ये सहभागी झाला होता. तसेच एमआयएमच्या स्थानिक नेत्याचा अंगरक्षक म्हणूनही तो वावरत असे आणि या नेत्याच्या आश्रयामुळे इमरानसारख्या संशयितास शहरात वास्तव्य करणे शक्य झाल्याचे मत गायकवाड यांनी मांडले. वाळू तस्करीच्या धंद्यात पडल्यावर पोलिसांशी त्याचे संबंध आले. त्यातून विशेष पोलीस पथकातील दोन पोलिसांशी त्याची चांगली मैत्री जमली. या प्रकारे गोध्रा हत्याकांडातील फरार संशयितास राजकीय व पोलीस प्रशासनाचे संरक्षण लाभत असेल तर शहराच्या सुरक्षिततेचे काय, असा प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित केला. संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली असता गुजरात पोलिसांच्या कार्यकक्षेत ही बाब येत असल्याचा तांत्रिक मुद्दा उपस्थित करून स्थानिक पोलिसांनी कानावर हात ठेवण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार गायकवाड यांनी केली. २८ जुलै रोजी गांधीनगर येथे गुजरातच्या गृह राज्यमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भात त्यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.