पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली असताना आज ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही चौकशीसाठी बोलावले होते. दरम्यान, आता संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी भाजपा नेते मोहित कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात कंबोज यांचाही समावेश असल्याचे सुनील राऊत म्हणाले.

”आज जी ईडीची कारवाई सुरू आहे, ती फक्त विरोधीपक्षांच्या नेत्यांवर सुरू आहे. किरीट सोमैया आणि मोहित कंबोजसारखी अमराठी माणसं सांगतात की विरोधीपक्षातील नेते भ्रष्ट आहेत. मात्र, स्वत: ते भ्रष्ट आहेत. हिंमत असेल तर भाजपाने पात्राचाळ घोटाळ्यातील नऊ कंत्राटदारांची चौकशी करावी, पण भाजपा अशी मागणी करणार नाही, कारण यात मोहित कंबोज यांच्याही समावेश आहे. मात्र, ते भाजपाचे कार्यकर्ते असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. ५० लाखांच्या खोट्या एंट्री दाखवून दबाव टाकून संजय राऊत यांना अटकवण्यात येत आहे”, अशी प्रतिक्रिया सुनील राऊत यांनी दिली आहे. तसेच या सर्व कंत्राटदारांच्या चौकशीची मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा – आधी पक्षप्रमुख उल्लेख टाळला, आता थेट ‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख करत एकनाथ शिंदे म्हणाले…

”वर्षा राऊत यांना दोन दिवसांपूर्वी ईडीचे समन्स आले होते. त्यानुसार त्या आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात गेल्या आहेत. या प्रकरणात जे सत्य आहे, ते सर्वांसमोर येईलच. मात्र, हे सर्व कारवाई कोणाच्यातरी दबावाखाली सुरू आहे. आम्ही जी जमीन विकत घेतली आहे, ती रेडी रेकनरप्रमाणेच विकत घेतली आहे. त्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचा रोखीचा व्यवहार झाला नाही”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – Maharashtra Live Updates : महाराष्ट्रातील विविध घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर…

दरम्यान, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आज खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या होत्या. पत्राचाळ गैरव्यवहार असो की अलिबागमधील जमिनीचे व्यवहार असो हे सर्व व्यवहार वर्षा राऊत यांच्या नावावर झाले आहेत, असा आरोप ईडीने केला आहे. त्यांनी याबाबत सेशन्स कोर्टातही कागदपत्रं सादर केली आहेत. आता वर्षा राऊत यांच्या खात्यावर अनोळखी लोकांकडून आलेल्या पैशांच्या व्यवहाराची चौकशी होणार आहे. त्यामुळे वर्षा राऊत यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे.