Supriya Sule : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठी पत्रकार संघातर्फे ‘फिनिक्स विशेष सन्मान’ पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “अनेक लोकांना वाटलं की, माझी राख होत आहे, पण तेवढ्यात मी भरारी घेतली.” त्यांच्या या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला. यावेळी त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द आणि राजकारणात आलेल्या कठीण परिस्थितीवर भाष्य केले. त्याबाबत आता सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं होतं?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “माझ्या संपूर्ण राजकीय आयुष्यात दोनच गोष्टी मला इथपर्यंत घेऊन आल्या. यातील पहिली गोष्ट म्हणजे संयम आणि दुसरी गोष्ट सकारात्मकता. तुम्हाला सिक्रेट सांगतो, मी चिडलेलो आहे, असं तुमच्या लक्षात आलं, तर समजायचं की मला भूक लागली आहे. मला जेव्हा भूक लागते, तेव्हाच चिडतो. मला काही खायला दिलं की शांत होतो. बाकी मला फारसा राग काही येत नाही.”
माझी राख होते आहे असं अनेकांना वाटलं पण मी भरारी घेतली-फडणवीस
“मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगलं आहे, हे पाहण्याचा प्रयत्न मी करतो. आणि कुठलंच काम माझ्याकडे आलं, की ते सकारात्मकतेने करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही या पुरस्काराला ‘फिनिक्स’ नाव दिलं आहे. पण मी काही राखेतून उभा झालेलो नाही. पण अनेक वेळा लोकांना असं वाटलं की, माझी राख होत आहे, तेवढ्यात मी भरारी घेतली. ही भरारी का घेऊ शकलो? जेव्हा जेव्हा राखेचा क्षण आला, तेव्हा त्याला सकारात्मकतेने सामोरा गेलो. आव्हानांपासून कधी पळालो नाही. आव्हानांना सामोरे गेलो आणि त्यांचा सामना केला. माणसं झुंजवली नाहीत, त्यांचा द्वेष केला नाही आणि टोकाचं राजकारणही केलं नाही. यामुळेच या कठीण परिस्थितीत मी एकेक पाऊल पुढे जात गेलो.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. याबाबत आता सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकारणात कधी कुणाची राख होत नाही-सुप्रिया सुळे
मला कधीच वाटलं नव्हतं त्यांची राख होईल. राजकारणात कधी कुणाची राख होत नाही आणि कुणी संपत नाही. देवेंद्र फडणवीस यांचं असं कधी काही होईल असं ध्यानीमनीही नाही. प्रत्येकजण आपल्या कष्टाने आणि विचाराने प्रयत्न करत असतो. कुणी कुणाला संपवायची भाषा करत असेल तर ते योग्य नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत असं कधी कुणाच्या ध्यानीमनी आलेलं नाही. किमान माझ्या तरी आलेलं नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.