Supriya Sule २०२३ मध्ये अजित पवारांनी त्यांचे राजकीय गुरु आणि काका शरद पवार यांच्या विचारसरणीपासून फारकत घेऊन पक्षातले ४२ आमदार घेऊन थेट युतीत जाणं पसंत केलं. त्यानंतर अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले. लोकसभा निवडणुकीत तर सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढतही पाहण्यास मिळाली. ही लढत थेट शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच होती. त्यात सुप्रिया सुळे निवडून आल्या. तर विधानसभेत अजित पवारांना प्रचंड यश मिळालं. दरम्यान ठाकरे कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भूमिकांमुळे रंगल्या आहेत. पवार कुटुंब एकत्र येणार का? याबाबत आता सुप्रिया सुळेंनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

पवार कुटुंब एकत्र येणार का?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३७ जागा मिळाल्या. त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवारांबाबत घेतलेली भूमिका ही काहीशी मवाळ झाल्याचं दिसून आलं. तसंच गेल्या काही दिवसांमध्ये काकांना विचारल्याशिवाय गोष्टी करता येत नाहीत. शरद पवारांनी संधी दिली अशी वक्तव्यं अजित पवारांकडून सातत्याने येत आहेत. त्यामुळे आता याबाबत खासदार सुप्रिया सुळेंना विचारलं असता त्यांनी भूमिका मांडली आहे.

सुप्रिया सुळे यांनी काय म्हटलं आहे?

“पवार कुटुंब कालही वेगळं नव्हतं, आजही नाही आणि उद्याही होणार नाही. कारण कौटुंबिक संबंध हे माझ्या आजी आणि आबा यांच्या संस्कारात आम्ही वाढलो आहोत. आमचे राजकीय मतभेद नक्की झाले असतील पण ते आम्ही आमच्या नात्यात किंवा घरात येऊ दिलेले नाहीत. यावरुन आमच्यावर टीका झाली आहे. ही टीका आम्हाला मान्य आहे. अनेक कार्यक्रमांत आम्ही अनेकदा एकत्र आलो की आमच्यावर टीका होते. एन. डी. पाटील हे देखील आमच्या घरातलेच होते. त्यांनीही अनेकदा शरद पवारांवर टोकाची टीका केली आहे. पण त्यामुळे माझी आत्या आणि त्यांची मुलं यांच्यात कधी कटुता आलेली नाही.” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अजित पवार सॉफ्ट झाले असतील तर गैर काय?

भाजपातल्या लोकांचे आपसांत जी काही नाती नसतील तेवढी आमची नाती अनेक दशकांपासून आहेत. या सगळ्याचं क्रेडिट मी यशवंतराव चव्हाण यांना देते. आपला विरोधक हा आपला शत्रू नसतो ही त्यांची शिकवण होती. लोकशाहीमध्ये मतभेद असलेच पाहिजेत, मनभेद असता कामा नये. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. जे काही राजकीय निर्णय दुर्दैवाने झाले, कोर्टात केसेस झाल्या, चिन्ह, पक्ष यांसाठी खूप लढावं लागलं. निवडणूक आयोगाच्या प्रत्येक सुनावणीला शरद पवार उपस्थित होते. न्यायालयातील लढाईही अजून सुरु आहे. अजित पवारांनी जर सॉफ्ट असतील तर आपण सगळ्यांनीच त्यांचं स्वागतच केलं पाहिजे. अजित पवार सॉफ्ट झाले म्हणजे यात गैर काय? त्यांनी त्यांच्या भाषणांची पद्धत बदलली असेल तर गैर काय? पंतप्रधानही अनेकदा शरद पवारांबाबत टोकाचं बोलतात, पण जेव्हा ते भेटतात तेव्हा ते प्रेमानेच बोलतात, प्रेमानेच वागतात असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवार आणि अजित पवार जो निर्णय घेत होते तो इतकी वर्षे मानतच आले होते-सुप्रिया सुळे

मला म्हणजेच सुप्रिया सुळेला शरद पवार आणि अजित पवार यांच्याविषयीचा काही प्रस्ताव अद्याप माझ्यापर्यंत आलेला नाही. मी एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहे. जेव्हा मी जे बोलते ते अत्यंत जबाबदारीने बोलत असते. शरद पवार आणि अजित पवार यांनी जो निर्णय घेत होते तो अनेक वर्षे मी मानतच आले आहे तर आज का मानणार नाही? मी जर तर ची उत्तरं देत नाही पण जो निर्णय शरद पवार घेतील तो मान्य असेल असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. अजित पवार आणि माझ्यामध्ये राजकीय मतभेदांचा विषय कधीच नव्हता. त्यांचं आणि माझं राजकारण वेगळं आहे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. News 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळेंनी ही भूमिका मांडली आहे.