Supriya Sule : विधानसभेच्या अधिवेशनावेळी सभागृहात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे मोबाइलवर ऑनलाइन रमी (पत्त्यांचा खेळ) खेळत असल्याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चांगलंच राजकारण तापलेलं आहे. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या संदर्भात कारवाईचा इशारा दिलेला आहे. दरम्यान, यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे. तसेच विधानसभेत रमी कोण खेळत होतं? असं मला दिल्लीत अनेक खासदार थांबवून थांबवून विचारतात असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

“महाराष्ट्रात एवढी अस्वस्थता सुरू आहे. दररोज महाराष्ट्राची समाजिक आणि आर्थिक परिस्थिती असेल किंवा महाराष्ट्रात क्राईम देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. राज्यासमोर खूप मोठी आव्हानं आहेत. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील दोन ते तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर होते. तसेच सध्या सुरू असलेल्या परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे. भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून आमच्या कानावर काही गोष्टी आल्या आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राची प्रतिमा खराब होईल अशी परिस्थिती आहे”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

“मी दिल्लीत असताना प्रत्येक राज्यातील खासदार मला थांबवून थांबवून विचारतात की तुमच्या महाराष्ट्रात रमीचा काय प्रकार सुरू आहे? विधानसभेत कोण मंत्री रमी खेळत होतं?, असे प्रश्न विचार विचारतात”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्रात कोणतीही घटना घडली तरी देशभरात जाते. त्या कंत्राटदारांच्या आत्महत्या प्रकरणाबाबत देखील मला प्रश्न विचारले, की खंरच महाराष्ट्रात दिवाळखोरी झाली आहे का? नेमकं काय परिस्थिती आहे? असे प्रश्न विचारले जातात”, असंही त्या म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मंत्र्यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतरच त्यांनी नैतिकतेने राजीनामे द्यायला पाहिजे होते. मात्र, हे दुर्देव आहे की यांना काढावं लागतं. दरवेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जायचं त्यानंतर दिल्लीतून फोन आला की मग हे राजीनामे देतात. दरवेळी दिल्लीने हस्तक्षेप केल्याशिवाय महाराष्ट्रात न्याय मिळणार नाही का?”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.