राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यातल्या बाप-लेकीच्या नात्याविषयी नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबतच सामान्य जनतेला देखील अप्रूप राहिलं आहे. एकीकडे अजित पवार यांची शरद पवारांचे वारसदार म्हणून अधून-मधून चर्चा होत असताना दुसरीकडे सुप्रिया सुळे देखील ठामपणे आपली वाटचाल करत आहेत. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यातल्या नात्याविषयी त्या दोघांना काय वाटतं? याची नेहमीच उत्सुकता राहिली आहे. यासंदर्भात खुद्द सुप्रिया सुळे यांनीच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवारांविषयी आपल्याला नेमकं काय वाटतं, याबद्दल सांगितलं आहे.

इस्लामपूरमध्ये कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीमध्ये यशवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात व्यासपीठावरून केलेल्या भाषणादरम्यान सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांविषयी सांगताना कवी दासू वैद्य यांनी लिहिलेल्या कवितेतल्या दोन ओळी म्हणून दाखवल्या.

“माझं वडिलांसोबत नातं तसं नाहीये, पण…”

“दासू वैद्य यांनी स्त्री भ्रूणहत्येसंदर्भात एक कविता लिहिली होती. ती कशी माझ्या आणि माझ्या वडिलांच्या नात्याला जोडली गेली हे मला माहिती नाही. पण आज वारंवार लोकांची इच्छा असते की ती मी म्हणावी. माझं आणि माझ्या वडिलांचं नातं तसं नाहीये, पण लोकांना वाटतं की आमचं नातं तसं आहे”, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

काय आहे ती कविता?

सुप्रिया सुळे यांनी २०१९मध्ये देखील एका सभेमध्ये आणि आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून ही कविता शेअर केली होती. “श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी; लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी…अशा त्या कवितेच्या ओळी आहेत. माझा बाप माझ्यासाठी एक बुलंद कहाणी आहे”, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

सिल्व्हर ओकवरील ‘तो’ प्रसंग!

अवघ्या काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला होता. यावेळी काही आक्रमक कर्मचारी थेट बंगल्याच्या गेटपर्यंत पोहोचले होते. काहींनी बंगल्याच्या दिशेनं चपला देखील भिरकावल्या होत्या. हा पवारांच्या घरावर हल्ला असल्याचं जरी बोललं जात असलं, तरी यादरम्यान आंदोलकांच्या गर्दीत त्यांना शांत राहण्याचं आवाहन करणाऱ्या सुप्रिया सुळेंचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. बंगल्यात आपले वडीस असल्याचं त्या सांगत होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझे आईवडील, माझी मुलगी घरात आहेत. पहिली त्यांची सुरक्षितता मला बघू द्या”, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणत असल्याचं व्हिडीओमधून दिसत आहे.