राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मे महिन्यात त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशनावेळी दिलेला राजीनामा हा चांगलाच चर्चेत होता. मी पक्षाचं अध्यक्षपद सोडतो आहे आणि यापुढे मी कुठलीही जबाबदारी स्वीकारणार नाही. नव्या लोकांना संधी दिली पाहिजे, असं म्हणत शरद पवार यांनी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील कार्यक्रमात पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. परंतु, शरद पवारांच्या या निर्णयाला अजित पवार वगळता पक्षातील सर्व नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला. परिणामी तीन दिवसांनी शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला. या राजीनामानाट्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया अधून-मधून येत असतात. दरम्यान, बुधवारी (११ ऑक्टोबर) पक्षातील वरिष्ठ नेते आणि शरद पवारांशी बंडखोरी करून अजित पवारांच्या गटात गेलेले छगन भुजबळ यांनी या राजीनामा नाट्यावर भाष्य केलं.

शरद पवार यांनी हा राजीनामा देणं हे काही थेट झालेलं नव्हतं. १५ दिवस आधीच हा विषय झाला होता अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भुजबळ यांनी राजीनामानाट्याबाबत वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. भुजबळ म्हणाले, “मे महिन्यात ज्या गोष्टी घडल्या त्याच्या १५ दिवस आधी शरद पवारांच्या घरात चर्चा झाली होती. अजित पवारांना ती चर्चा माहीत असावी. त्यामध्ये असं ठरलं होतं की शरद पवारांनी राजीनामा द्यायचा. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रम घ्यायचा, त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांना पक्षाचं अध्यक्ष करायचं आणि मग आपण भाजपाबरोबर जायचं. त्यामुळेच त्यांनी अचानक राजीनामा दिला. शरद पवार राजीनामा देणार याची मलाही कल्पना नव्हती.”

यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. खासदार सुळे यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. त्यावेळी त्या म्हणाल्या, शरद पवार यांनी राजीनामा दिला होता, तो त्यांना द्यायचाच नव्हता. परंतु, या सगळ्यांचा (सध्या अजित पवार गटात असलेले नेते) आग्रह होता की आपण भाजपाबरोबर जायचं, या आग्रहामुळे शरद पवार दुखावले गेले होते. ते दुखावले गेल्यानेच त्यांनी राजीनामा दिला होता. त्यांची राजीनामा देण्याची अजिबात इच्छा नव्हती. तुम्हाला ते नाट्य वाटत असेल पण आमच्यासाठी ते वास्तव होतं.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवार यांनी राजीनामा दिल्यावर महाराष्ट्राची जनता, माध्यमं, पक्षाचे कार्यकर्ते, पक्षातील सहकारी या सगळ्यांनी शरद पवारांना विनंती केली. सगळे पवारांना म्हणाले, तुम्हालाच ही जबाबदारी घ्यावी लागेल आणि त्याचवेळी छगन भुजबळ म्हणाले, कमिटी वगैरे काही चालणार नाही, तुम्हालाच ही जबाबदारी घयावी लागेल. भुजबळांनी शरद पवारांना आग्रह केला तुम्हीच अध्यक्षपदी राहीलं पाहिजे.

हे ही वाचा >>वाघनखं महाराष्ट्रात कधी येणार? लंडनहून परतलेले सुधीर मुनगंटीवार म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासदार सुळे म्हणाल्या, इथे मला छगन भुजबळांमधला आणखी एक विरोधाभास दिसतो. एकीकडे ते म्हणतात की शरद पवारांनी आम्हाला वाट दाखवली, दुसऱ्या बाजूला ते म्हणतात शरद पवार भाजपाशी चर्चा करत होते, तर कधी म्हणतात, शरद पवार हुकूमशाहसारखे वागायचे, पक्षावर वर्चस्व गाजवत होते. परंतु, ते हुकूमशाहसारखे वागत असते तर पक्षाच्या अध्यक्षाच्या निवडीसाठी त्यांनी समितीची स्थापना केलीच नसती.