Supriya Sule on Manikrao Kokate: रमी राव मंत्री यांच्यावर आता नवी जबाबदारी देऊन त्यांचे एकप्रकारे प्रमोशनच करण्यात आले आहे ते कालही कॅबिनेट मंत्री होते, आजही कॅबिनेट मंत्रीच आहेत. फक्त कृषी खात्याऐवजी आता त्यांना क्रीडा खाते देण्यात आले आहे. कृषी खात्यात त्यांनी असंवेदनशीलपणा दाखवला, ते स्पोर्ट्समध्येही फार मागे राहतील, असे मला वाटत नाही.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, माझे किरेन रिजिजू यांच्याशी टोकाचे मतभेद असले तरी त्यांनी खेलो इंडिया सारखा उत्तम कार्यक्रम त्यांनी देशाला दिला. जेवढे महत्त्व शिक्षण क्षेत्राला आहे, तेवढेच महत्त्व क्रीडा क्षेत्रालाही आहे. आज कितीतरी युवा खेळाडू क्रीडा क्षेत्रात आपले करिअर करत आहेत. मी कालच बुद्धिबळपटू आणि विश्वविजेती दिव्या देशमुखची विमानतळावर भेट घेतली. नागपूरच्या दिव्याने देशाची मान उंचावली आहे.
माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास खाते देण्यात आले आहे. ही दोन्ही खाती महत्त्वाची आहेत. अल्पसंख्याकामध्ये मुस्लीम, पारशी, जैन अशा कितीतरी समाजाचा समावेश होतो. जो व्यक्ती शेतकरी आणि सरकारला भिकारी म्हणतो, तो क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना काय म्हणेल याचा काही भरवसा नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
कोकाटे यांचा राजीनामा घ्यायला हवा होता, मात्र त्यांना बढती दिली. कोकाटेंनीही नैतिक जबाबदारीतून स्वतःचा राजीनामा देऊन बाजूला व्हायला हवे होते. त्यांनी आत्मक्लेष करायला हवा होता, पण महाराष्ट्रासाठी दुर्दैव आहे की, त्यांना क्रीडा खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
रमी रावांमुळे महाराष्ट्राची देशात बदनामी
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, माणिकराव कोकाटे सभागृहात रमी खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे महाराष्ट्राची देशात बदनामी झाली. दिल्लीत सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनातही अनेकजण हा रमी राव कोण आहे? अशी विचारपूस करत असतात. प्रत्येक राज्याचा माणूस मला याबद्दल प्रश्न विचारत असतो. तुमच्या महाराष्ट्राच्या सभागृहात रमी खेळतात का? असे प्रश्न लोक उपस्थित करतात, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.