शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षाचं ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह कुणाचं यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू होती. हा वाद सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापर्यंत गेला. अखेर घटनापीठाने पक्षचिन्हाचा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला दिला. मात्र, अद्यापही निवडणूक आयोगाने याबाबतचा निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता, त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंनी आमंत्रण दिल्यास दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार का? नारायण राणेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

“चिन्हाबाबत मी माझ्या काही सहकार्यांबरोबर चर्चा करत होते. त्यावेळी त्यांनी मला सांगितले, की राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हा लगेच निवडणुका लागल्या होत्या. तेंव्हा आता सारखा सोशल मीडियाही नव्हता. मात्र, तरीही आम्ही घड्याळ हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवलं आणि आमच्या जागा निवडून आल्या. त्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेला चिंन्ह दिलं किंवा गोठवलं, तरी फार काही फरक पडणार नाही. आज नवीन तंत्रज्ञान सोशल मीडिया उपब्लध आहे. त्यामुळे शिवसेनेला फार अवघड जाणार नाही”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

हेही वाचा – अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा पाठिंबा कोणाला?, शरद पवारांनी दोन वाक्यात विषयच संपवला; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना होणाऱ्या विलंबावरूनही राज्य सरकारवर टीका केली. “मला निवडणुकांची काळजी यासाठीच वाटतं की, निवडणुका न झाल्याने जनतेची अनेक कामं रखडलेली आहे. एखाद्याला मनपा किंवा जिल्हा परिषदेत काम असेल, तर तो लोक प्रतिनिधींशी संपर्क करू शकतो. मात्र, आता लोकप्रतिनिधीच नसल्याने ती व्यक्ती कुठं धावपळ करेन, आम्ही सर्व कामं करण्यासाठी आहोतच, पण सत्तेचं विक्रेंद्रीकरण करून प्रत्येकाला वाटून दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडणं आवश्यक आहे”, असेही त्या म्हणाल्या.