राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सतत डावलले जात असल्याने माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील समर्थकांसह भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने सध्या जोर पकडला आहे. या प्रश्नी निर्णय घेण्यासाठी त्यांनी मंगळवारी आयोजित केलेली कार्यकर्त्यांची बठक काही कारणास्तव रद्द झाली. आता ही बठक कधी होणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ‘लोकसत्ता’शी बोलताना पाटील यांनी आपल्या भाजप प्रवेशाबाबत होत असलेल्या चर्चेचा व नाराजीचा बादरायण संबंध जोडला जात आहे, असे स्पष्ट केले. स्वत: पाटील यांनीच भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केल्याने याविषयी होणाऱ्या चर्चेला विराम मिळाल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या सूर्यकांता पाटील पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याची चर्चा अलीकडे चांगलीच रंगली. िहगोली लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात असताना काँग्रेसला सोडला. त्यामुळे सूर्यकांता पाटील यांची नाराजी दूर करण्याच्या नावाखाली राजकीय पुनर्वसन करताना राज्यपालनियुक्त विधान परिषद सदस्यत्वासाठी राष्ट्रवादीकडून त्यांची शिफारस झाल्याची घोषणा करण्यात आली होती.
सूर्यकांता पाटलांचे राजकीय पुनर्वसन होत असल्याने त्यांच्या समर्थकांनीही फटाके फोडून आनंद साजरा केला. राष्ट्रीय राजकारणात विविध पदे भूषविणाऱ्या सूर्यकांता पाटील यांना विधान परिषदेवर संधी प्राप्त झाल्याच्या वृत्तामुळे नांदेड, िहगोली जिल्ह्यांत ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला, मात्र हा आनंद क्षणिक ठरला, कारण पक्षातर्फे रामराव वडकुते यांची विधान परिषद सदस्य पदासाठी शिफारस करण्यात आली. सोमवारी वडकुते यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. त्यांच्या समर्थकांनी परभणी, िहगोली, नांदेडमध्ये फटाके फोडून आनंद साजरा केला.
मात्र, राष्ट्रवादीकडून अपमान झाल्याने सूर्यकांता पाटील मात्र नाराज असून, त्यातूनच पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपत प्रवेशाचा निर्णय घेतला असल्याचे त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत होते. याच संदर्भात त्यांनी मंगळवारी सिटी प्राईड हॉटेल येथे राष्ट्रवादीतील समर्थक, कार्यकर्त्यांची बठकही आयोजित केली होती. बठकीचा निरोपही कार्यकर्त्यांना पाठविला होता. परंतु ही बठकच अचानक रद्द झाली. ही बठक कधी होणार, त्यात कार्यकत्रे काय भूमिका मांडतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपत प्रवेश करण्याच्या निमित्ताने ही बैठक आयोजित केली होती. भाजप नेते विनोद तावडे यांच्यामार्फत भाजपत प्रवेश करण्यासाठी मुंबईत चर्चा झाली असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून कळाले.
‘भाजपमध्ये जाणार नाही’
या सर्व घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर सूर्यकांता पाटील यांच्याशी संपर्क साधला असता हिंगोली लोकसभेची जागा काँग्रेसला दिल्याने आपण नाराज असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, याचा संबंध भाजप प्रवेशाशी जोडणे चुकीचे आहे. आमदारकीसाठी मी पक्षाकडे कधीही प्रयत्न केले नाहीत. तसेच कोणाला संधी द्यायची हा पक्षाध्यक्षांचा अधिकार असतो. गेली ३०-३५ वर्षे काँग्रेस पक्षात राहून राजकारण केले आहे. राष्ट्रवादीत नाराज असले तरी पक्ष सोडण्याइतकी ही नाराजी नक्कीच नाही. तसे करावेच वाटले तर सर्वाना सांगून करेल, असेही पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.