ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या चिमूर तालुक्यातील कोलारा परिसरात फेब्रुवारीपासून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दोन महिला व तीन पुरुषांना ‘टी-१’या वाघाने ठार केले होते. सततच्या हल्ल्याने दहशत निर्माण झाल्यामुळे प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी त्याला जेरबंद करण्याचे आदेश दिले. चैती संरक्षीत वनक्षेत्रात ९ जून रोजी या वाघाला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यात वनखात्याच्या पथकाला यश आले. ११ जूनला त्याची नागपूर येथील गोरेवाड्यातील वन्यजीव बचाव केंद्रात रवानगी करण्यात आली होती.
दरम्यान, नागभिड तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या आणखी एका वाघाला रविवारी जेरबंद करून मध्यरात्रीच त्याची रवानगी गोरेवाड्यातील बचाव केंद्रात करण्यात आली होती. या वाघाला केंद्रात स्थिर करत नाही तोच कोलाऱ्यातील वाघाच्या मृत्यूची घटना समोर आल्याने वनखात्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान वन्यजीवप्रेमींमध्ये या मृत्यूवरुन विविध तर्कवितर्क लढवले जात आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण समोर येईल, असे संबंधीत अधिकाऱ्यानी सांगितले.