येत्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीशी युती करण्याचा निर्णय स्वतंत्र भारत पक्षाने घेतला असून शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्यावर चर्चा होऊन शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप यांनी येथे दिली.
पुसदा (जि.अमरावती) येथे शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची बैठक पार पडली. यानंतर येथील विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना वामनराव चटप यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाच्या विषयावर समान विचारांचा धागा पकडून अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’सोबत युती करण्याविषयी संघटनेत एकमत झाल्याचे सांगितले. स्वतंत्र भारत पक्षाने राज्यात चंद्रपूर आणि नांदेड या दोन लोकसभेच्या जागा लढवण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असून इतर जागांवर ‘आप’शी युती करण्याविषयी संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा झाली. आम आदमी पक्षासोबत प्राथमिक स्तरावरची बोलणी झाली आहे. लवकरच जागांच्या बाबतीत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
शेतकरी संघटना आणि आम आदमी पक्षाच्या काही भूमिका मिळत्या-जुळत्या आहेत. शेतकरी संघटनेने भ्रष्टाचाराविरोधात दशकभराआधी ‘क्यू’ हे आंदोलन छेडले होते. ‘नेता-तस्कर-गुंडाराज हटाव’ हा नारा शेतकरी संघटनेने १८ वर्षांपूर्वी दिला होता. देशातील भ्रष्टाचाराला जनता कंटाळली आहे. काँग्रेसविरोधात याच मुद्यावर वातावरण पेटले आहे. स्वतंत्र भारत पक्षाने ‘आप’सोबत युती करण्यासाठी काही विषय मांडले आहेत. दोन्ही पक्षांचा किमान समान कार्यक्रम समोर ठेवून युतीचा प्रवास होऊ शकेल, किंवा जागा वाटपातील ‘अॅडजेस्टमेंट’ देखील होऊ शकेल. भविष्यात चर्चेतून काय निष्पन्न होईल, हे आताच सांगणे शक्य नसले, तरी ‘आप’सोबत युती होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
काही मुद्यांवर आपसोबत स्वतंत्र भारत पक्षाचे मतभेद आहेत, पण वादाचे मुद्दे बाजूला ठेवून आघाडी होऊ शकते, या निष्कर्षांप्रत आम्ही आलो आहोत. काँग्रेस हा शेतकरी संघटनेचा शत्रू क्रमांक एक आहे. एनडीए आणि युपीए या दोन्ही आघाडय़ांची दारे आम्हाला नको आहेत. चंद्रपूर आणि नांदेड या दोन लोकसभेच्या जागा वगळता इतरत्र आपच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय शेतकरी संघटनेने घेतला आहे,
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2014 रोजी प्रकाशित
स्वतंत्र भारत पक्ष ‘आप’सोबत जाणार?
येत्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीशी युती करण्याचा निर्णय स्वतंत्र भारत पक्षाने घेतला असून शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्यावर
First published on: 15-01-2014 at 01:33 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swatantra bharat paksh may alliance with aap