सागरी जलतरण स्पर्धेच्यावेळी मालवण येथे एका जलतरणपटूचा आज एका स्पर्धकाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. अर्जुन वराडकर असे या स्पर्धकाचे नाव असून सलग दुसऱ्या दिवशी स्पर्धकाचा बुडून मृत्यू झाल्याने सिंधुदुर्गात खळबळ उडाली आहे.
राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत भाग घेण्यासाठी अर्जुन वराडकर (वय ५०) हे मुंबईहून मालवणला आले होते. मात्र पोहताना त्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी मालवण पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून अधिक तपास सुरू आहे.
अर्जुन आणि आणखी एक स्पर्धक बुडाल्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. परंतु, स्पर्धेच्या ठिकाणी रुग्णवाहिकेची व्यवस्था नव्हती. त्यामुळे दोघांनाही रुग्णालयात उशिरा दाखल केले गेले. रुग्णालयात अर्जुन यांना मृत घोषित करण्यात आले. आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे अर्जुनचा मृत्यू झाल्याचा आरोप वराडकर कुटुंबीयांनी केला आहे.
शनिवारी सुरेखा संजय गलांडे या नाशिक येथील महिलेचा समुद्रात सराव करत असताना बुडून मृत्यू झाला होता. गलांडे या त्यांच्या मुलासह मालवणला आल्या होत्या. मतीमंद गटातून त्यांचा मुलगा या स्पर्धेत भाग घेणार होता. शनिवारी सकाळी त्या चिवला बीचवर सरावासाठी गेल्या असता पाण्यात बुडाल्या. त्यांना पाण्यात बुडताना पाहून स्थानिकांनी त्यांना पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.