रामनवमी उत्सवाच्या मिरवणुकीत झालेल्या दगडफेकीत पोलिसांनी हिंदू कार्यकर्त्यांवर गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल केले आहेत. ते तातडीने मागे घेऊन या मिरवणुकीवर दगडफेक करणा-या धर्मांध शक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीने केली आहे.
युतीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले. या कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे न घेतल्यास हिंदुत्ववादी संघटना आंदोलन करतील, असा इशारा या वेळी देण्यात आला. माजी आमदार अनिल राठोड व भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, मनपातील विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, नगरसेवक गणेश कवडे, अनिल बोरुडे, विक्रम राठोड, नरेंद्र कुलकर्णी, प्रकाश भागानगरे आदींचा समावेश होता.
पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की नगर शहरात शांततेने श्रीरामनवमी साजरी केली जात असताना काही धर्मांध शक्तींनी या उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आहे. रामनवमीची मिरवणूक आशा टॉकीज चौकात आली असताना मुस्लीम तरुणांनी मिरवणुकीवर दगडफेक करून हिंदूंच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न केला. तरीही हिंदू कार्यकर्त्यांनी अत्यंत संयम व शांतता राखली असताना पोलिसांनीही या कार्यकर्त्यांवरच लाठीमार करून या अशांततेत भर घातली. शिवाय या कार्यकर्त्यांवरच ३०७, ३९५ अशी गंभीर कलमे लावून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेली २५ वर्षे शहरात शांतता नांदत असताना या प्रकारामुळे त्यात बाधा येण्याची शक्यता आहे. आत्ताच हा प्रकार कसा झाला, याची पोलिसांनी सखोल चौकशी करून ख-या गुन्हेगारांवर याबाबतचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Take back false cases above hindu activists
First published on: 01-04-2015 at 03:30 IST