मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सावंतवाडी-कोलगाव (जि. सिंधुदुर्ग) तिठय़ावर एस.टी. बस व मोटारसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात साखरी नाटे (ता. राजापूर) येथील प्रवीण वसंत शिंदे (वय ४८) व प्रेरणा प्रवीण शिंदे (वय ४२) हे शिक्षक दाम्पत्य जागीच ठार झाले. हा अपघात सोमवारी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, प्रेरणा शिंदे यांच्या सावंतवाडीतील शिक्षिका मैत्रिणीच्या भावाच्या लग्नासाठी निघालेल्या या दाम्पत्यावर काळाने झडप घातल्यामुळे वधू-वरांच्या डोक्यावर अक्षता टाकण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले. या घटनेमुळे साखरी नाटे परिसरासह राजापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. राजापूर तालुक्यातील नाटेनगर विद्यामंदिरचे माध्यमिक शिक्षक प्रवीण शिंदे आणि त्यांच्या पत्नी प्रेरणा शिंदे या मोगरे प्राथमिक शाळेच्या शिक्षिका होत. प्रेरणा शिंदे यांच्या शिक्षिका मैत्रिणीच्या भावाच्या लग्नासाठी आपल्या पतीसमवेत आल्या होत्या. सोमवारी सकाळी सर्व वऱ्हाडी मंडळी विवाहस्थळी निघाली. त्यांच्या मागून शिंदे दाम्पत्य दुचाकीवरून (क्र. एमएच ०७ ई ४१४१) वेंगुर्ले-बेळगाव रस्त्याने ते पिंगुळीच्या दिशेने निघाले होते. त्यांची मोटारसायकल कोलगाव तिठय़ाजवळ आली असता सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या कणकवली-सावंतवाडी एसटी बसला (क्र. एमएच २०- बीएल १०६९) समोरून चालकाच्या बाजूने मोटारसायकलची जोरदार धडक बसली. मोटारसायकल बसच्या चाकाखाली सापडून सुमारे पंधरा-वीस फूट फरफटत गेली. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या प्रवीण शिंदे व त्यांच्या पत्नी प्रेरणा यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र तत्पूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला होता. शिंदे दाम्पत्याला प्रणव (१६) व शर्वरी (१२) अशी दोन मुले असून यापैकी प्रणव हा दहावीत आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दहावीच्या परीक्षेला प्रणवला सामोरे जावे लागणार आहे. अशावेळी त्याला मानसिक बळ देणारे त्याचे आई-वडील त्याच्यापासून कायमचे दूर गेले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 21st Feb 2013 रोजी प्रकाशित
साखरी नाटेतील शिक्षक दाम्पत्य अपघातात ठार
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सावंतवाडी-कोलगाव (जि. सिंधुदुर्ग) तिठय़ावर एस.टी. बस व मोटारसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात साखरी नाटे (ता. राजापूर) येथील प्रवीण वसंत शिंदे (वय ४८) व प्रेरणा प्रवीण शिंदे (वय ४२) हे शिक्षक दाम्पत्य जागीच ठार झाले. हा अपघात सोमवारी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, प्रेरणा शिंदे यांच्या सावंतवाडीतील शिक्षिका मैत्रिणीच्या
First published on: 21-02-2013 at 07:06 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teacher couple died in accident