पुढील वर्षांची फी ठरविण्यासाठी १० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली येथील रासबिहारी इंटरनॅशनल शाळेच्या शिक्षक-पालक संघाची बैठक पालकांच्या तीव्र विरोधानंतर अखेर शाळेला रद्द करावी लागली आहे. मागील चार-पाच वर्षांच्या फीला शाळेने अद्याप शासनाची मान्यता घेतलेली नाही. त्याविरोधात पालक आंदोलन करत आहेत. शाळेची फी अधिक असल्याचा निष्कर्ष शिक्षण खात्याच्या चौकशी समितीने काढल्यानंतर शाळेच्या खर्चाची तपासणी सरकारी लेखापालाकडून करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यामुळे पालक संघाची बैठक रद्द करावी, अशी मागणी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचच्या नेतृत्वाखाली पालकांच्या शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालकांकडे केली होती. पालकांच्या मागणीवर कार्यवाही करत सहाय्यक संचालक आर. आर. मारवाडी यांनी शासनाने मागील वर्षांची फी ठरविल्यानंतर पुढील वर्षांची फी ठरविण्यासाठी पालक संघाची बैठक शाळेने घेण्याचे निर्देश दिले होते. चौकशी समितीचा पूर्ण अहवाल मिळावा, अशी मागणी पालकांनी केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी राजीव म्हसकर यांनी तो अहवाल पालकांना दिला. या अहवालाचा अभ्यास करून पालक आपले म्हणणे लवकरात लवकर शिक्षण उपसंचालक कार्यालयात सादर करणार आहेत. शाळेचा फक्त मान्यताप्राप्त खर्च विचारात घेऊन फी ठरविण्यात यावी, अशी पालकांची मागणी आहे.
शाळेचे हिशेब तपासून वाजवी फी शासनाने लवकरात लवकर ठरवून द्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. शासनाकडून जोपर्यंत फी ठरविली जात नाही तोपर्यंत शाळा मागत असलेली अवाजवी फी भरू नये, असे आवाहन पालक संघटनेने केले आहे.