बाजारात मिळणारे ‘गाइड’ वापरण्यापेक्षा स्वत: अभ्यास करा, अशा शब्दांत विद्यार्थ्यांना ‘डोस’ पाजणारे गुरुजी स्वत: मात्र ‘झटपट अभ्यासा’ची वाट धरत आहेत. यंदा राज्यात प्रथमच होत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) बसलेले बहुतांश शिक्षक ‘गाइड’ किंवा तत्सम शैक्षणिक पुस्तकांचा आधार घेत आहेत. विशेष म्हणजे, टीईटीचा संपूर्ण अभ्यासक्रम पहिली ते बारावी या अभ्यासक्रमावर आधारीत आहेत.
महाराष्ट्र शासनाकडून यावर्षी प्रथमच शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा १५ डिसेंबरला होणार आहे. पहिली ते पाचवी (प्राथमिक स्तर) आणि सहावी ते आठवी (उच्च प्राथमिक स्तर) अशा दोन स्तरांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. प्राथमिक स्तरावरील परीक्षेसाठी पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमावरच प्रश्न विचारण्यात येणार आहेत, तर उच्च प्राथमिक स्तरावरील परीक्षेसाठी पहिली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारण्यात येणार आहेत.
ही परीक्षा देणाऱ्यांमध्ये शिक्षकांची संख्या मोठी आहे. मात्र, सध्या शाळांमध्ये शिकवत असलेल्या शिक्षकांनाही पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा देण्यासाठी गाइड्चा आधार वाटत असल्याचे दिसून येत आहे. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारी पुस्तके, गाइड्स, प्रश्नसंच यासाठी बाजारात मोठी मागणी आहे.
राज्यात पहिल्यांदाच होणाऱ्या या परीक्षेसाठी जवळपास ७ लाख उमेदवार बसले आहेत. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षेच्या रूपाने बाजारपेठेलाही लॉटरीच लागली आहे. बाजारात टीईटीसाठी मार्गदर्शन करणारी ४० ते ५० पुस्तके उपलब्ध आहेत.
राज्यातील २५ ते ३० प्रकाशन संस्था ही पुस्तके प्रकाशित करत आहेत. साधारण ३५० ते ६०० रुपये या दरम्यान पुस्तकांच्या किमती आहेत. साधारण सप्टेंबरपासून बाजारपेठेमध्ये आलेल्या या पुस्तकांची उलाढाल अवघ्या तीन महिन्यांमध्ये लाखोंच्या घरात पोहोचली आहे. यामध्ये प्रश्नसंच आणि गाइडला सर्वाधिक मागणी असल्याचे पुण्यातील उज्ज्वल ग्रंथ भांडार या दुकानातील विक्रेत्यांनी सांगितले.
राज्यात पहिल्यांदाच टीईटी होत असल्यामुळे सध्या त्याच्या पुस्तकांना खूप मागणी आहे. प्रगती प्रकाशनच्या पुस्तकाच्या आतापर्यंत ६ हजार प्रतींची विक्री झाली आहे.
– जग्नेश फ्युरिया, प्रगती प्रकाशन
संग्रहित लेख, दिनांक 27th Nov 2013 रोजी प्रकाशित
पात्रता परीक्षेसाठी गुरुजींना ‘गाइड’चे धडे!
बाजारात मिळणारे ‘गाइड’ वापरण्यापेक्षा स्वत: अभ्यास करा, अशा शब्दांत विद्यार्थ्यांना ‘डोस’ पाजणारे गुरुजी स्वत: मात्र ‘झटपट अभ्यासा’ची वाट धरत आहेत.
First published on: 27-11-2013 at 02:17 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teacher using guide for teacher eligibility test