तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएसचे प्रमुख के चंद्रशेखर राव आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांचा हा दुसरा महाराष्ट्र दौरा होता. कोल्हापूर दौऱ्यावर असताना के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर मोठं भाष्य केलं आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसनंतर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षही फुटण्याच्या मार्गावर आहे,असं मोठं विधान के चंद्रशेखर राव यांनी केलं आहे. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

खरं तर, के चंद्रशेखर राव सध्या आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. काही दिवसांपूर्वी ते शक्तीप्रदर्शन करत पंढरपूरमध्ये विठूरायाच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी ते पक्षबांधणीसाठी कोल्हापूरला आले. दरम्यान, त्यांनी विरोधी पक्षांच्या ‘INDIA’ सह भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएवर जोरदार टीका केली. दोन्ही सरकारांकडून देशात लोकांच्या हिताची कोणतीही कामं झाली नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा- पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर अजित पवारांची मणिपूर हिंसाचारावर प्रतिक्रिया, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रातील पक्षफुटीवर भाष्य करताना के चंद्रशेखर राव म्हणाले, “सर्वात आधी काँग्रेस फुटली. शरद पवारांनी काँग्रेसला फोडलं होतं. आता त्यांचा स्वत:चाच पक्ष फुटला. शिवसेनाही फुटली. आता असंही कानावर येतंय की, काँग्रेसही फुटण्याच्या मार्गावर आहे. राजकीय पक्षांचे आणखी किती तुकडे होणार आहेत, याचा निर्णय जनता घेईल. माझ्यापेक्षा अधिक जनतेला माहीत आहे. महाराष्ट्रात काही घटना अशाही घडल्या आहेत. ज्यामध्ये काही युवकांनी आपलं मतदान कार्ड जाळून टाकलंय. फोडाफोडीमुळे त्यांनी आपला आक्रोश व्यक्त करण्यासाठी मतदान कार्ड जाळलंय, हे सगळं पाहून लोकांनीच काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे.”