scorecardresearch

राज्यात उष्णतेच्या लाटांचा चटका ; मार्चअखेर आणि एप्रिलची सुरुवात दाहक

उन्हाळय़ाच्या हंगामाचा दुसरा महिना असलेल्या मार्चमध्येच नागरिकांना उन्हाच्या तीव्र चटक्यांचा अनुभव येत आहे.

पुणे : मार्च महिन्याचा सुरुवातीचा काळ उन्हाच्या झळांनी हैराण करणारा ठरला असतानाच आता महिन्याची अखेर आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीचे काही दिवस दाहक ठरण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर आणि पश्चिम-मध्य महाराष्ट्रात काही भागांत पुढील तीन ते चार दिवस उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या कालावधीत संपूर्ण राज्यात दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. उन्हाच्या तीव्र झळांमध्ये नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

उन्हाळय़ाच्या हंगामाचा दुसरा महिना असलेल्या मार्चमध्येच नागरिकांना उन्हाच्या तीव्र चटक्यांचा अनुभव येत आहे. महिन्याच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मुंबई परिसरासह कोकण विभागात आणि त्यानंतर विदर्भात उष्ण्तेच्या लाटा निर्माण झाल्या. या काळातही अनेक भागांत तापमान ४० अंशांपर्यंत गेले होते. मध्यंतरीच्या काळात समुद्रातील बाष्पाच्या पुरवठय़ामुळे अंशत: ढगाळ वातावरणामुळे तापमानात किंचित घट झाली होती. मात्र, पुन्हा कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशाची स्थिती राज्यात निर्माण झाली आणि त्यातच उत्तर-पश्चिमेकडून राज्याकडे कोरडे-उष्ण वारे वाहू लागल्याने राज्याच्या तापमानात वाढ सुरू झाली. येत्या चार ते पाच दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र दिवसाच्या कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ कायम राहणार आहे.

विदर्भात सध्या काही भागात उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. या विभागात सर्वच ठिकाणी कमाल तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. सरासरीच्या तुलनेत या भागात २ ते ४ अंशांनी तापमान वाढले असल्याने उन्हाचा चटका तीव्र आहे. दोन-तीन दिवसांत त्यात आणखी वाढीची शक्यता आहे. अकोला येथे सोमवारी राज्यातील उच्चांकी ४२.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. विदर्भात ३१ मार्चपर्यंत उष्णतेची लाट राहणार आहे. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर वगळता इतरत्र कमाल तापमान ४० अंशांजवळ आले आहे. या विभागात ३० मार्च ते १ एप्रिल या कालावधीत उष्णतेच्या लाटेची स्थिती राहणार आहे. मराठवाडय़ात सर्वत्र कमाल तापमान ४० अंशांपुढे गेले आहे. या विभागातही ३० मार्च ते १ एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट राहणार आहे. मुंबई परिसर आणि कोकणातील तापमानाचा पारा सरासरीच्या जवळ आहे. मात्र, पुढील दोन-तीन दिवसांत त्यात काही प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज आहे.

उष्णतेची लाट कुठे येणार?

राज्यात सर्वच ठिकाणी पुढील चार ते पाच दिवस दिवसाच्या कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. ३० मार्च ते १ एप्रिल या कालावधीत नगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत उष्णतेची लाट तीव्र असेल. २९ ते ३१ मार्च या कालावधीत अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांत, ३१ मार्चला चंद्रपूर, तर ३०, ३१ मार्चला वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेची लाट येईल.

जम्मू, हिमाचल प्रदेशातही होरपळ

जम्मू-काश्मीर किंवा हिमाचल प्रदेश म्हटले की, बर्फ आणि थंडाव्याची अनुभूती अपोपापच येते. पण, उष्ण वाऱ्यांमुळे सध्या याही विभागांमध्ये उष्णतेची लाट आली आहे. जम्मू आणि हिमाचल प्रदेशात २९ मार्चपर्यंत उष्णतेची लाट राहील. त्याखालोखाल राजस्थानमध्ये उष्णतेची लाट असून, ती १ एप्रिलपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिसा, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांतही मार्चअखेपर्यंत उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही तापमानात वाढ होऊन उष्णतेची लाट निर्माण होणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Temperature rise in maharashtra heat wave in maharashtra zws