सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेने व सुरळीतपणे पार पडण्यासाठी निमलष्करी दलाच्या दहा तुकडय़ांना पाचारण करण्यात आले असून त्यापैकी सहा तुकडय़ा आल्या आहेत. याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकडय़ा दाखल होत आहेत. तर निवडणूक प्रक्रियेला बाधा पोहोचू नये म्हणून आतापर्यंत सुमारे दहा हजार व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय मंडलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा ग्रामीण भागात एकूण २६२१ मतदान केंद्रे असून त्यापैकी ४२ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. यात पोलिसांच्या नजरेतून २५ मतदान केंद्रांची संवेदनशील म्हणून ओळख आहे. अक्कलकोट तालुक्यातील दुधनी, मोहोळ तालुक्यातील अनगर, शेटफळ, माळशिरस तालुक्यातील नातेपुते, बार्शी तालुक्यातील वैराग, कुर्डूवाडी आदी भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे व शांततेत पार पडण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक मंडलिक यांनी सांगितले.
आतापर्यंत दहा हजारांपेक्षा जास्त व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून यात एकूण ५६६ समाजकंटकांवर हद्दपारीची कारवाई करण्यात येत आहे. यात मुंबई पोलीस कायदा कलम १४४ (३) नुसार ४०९ जणांना ठराविक मुदतीसाठी तर उर्वरित १५७ व्यक्तींना नियमित कारवाईखाली हद्दपारीची कारवाई होत आहे. मात्र हद्दपारीच्या कारवाईची अंमलबजावणी प्रत्यक्षात कितीजणांवर झाली, याचा तपशील देण्यास मंडलिक यांनी असमर्थता दर्शविली. जिल्ह्य़ात एकूण ३८०० अधिकृत शस्त्र परवानाधारक असून त्यापैकी ३२०० शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. अवैध शस्त्रांचा वापर टाळण्यासाठी पोलीस प्रशासन नजर ठेवून असून त्यात मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक बेकायदा पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. बार्शी, पंढरपूर, करमाळा, अक्कलकोटमध्ये संघटित गुन्हेगारी कारवाई होऊ नयेत म्हणून धाडसत्रही सुरू असल्याचे मंडलिक यांनी सांगितले.
निवडणूक काळात निमलष्करी दलाच्या दहा तुकडय़ा व राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकडय़ांसह गृहरक्षक दल, स्थानिक पोलीस दल असे मिळून एकूण पाच हजारांएवढे पोलीस मनुष्यबळ वापरण्यात येत आहे. तर २५० खासगी वाहने उपलब्ध केली जात आहेत. संख्यात्मक मनुष्यबळापेक्षा गुणात्मकतेचा वापर केला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी हे उपस्थित होते.