पाथरी शहरात नामदेवनगरच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेवरील पाच पांडवांचा ओटा व दर्गा या वादातून सोमवारी दुपारी तणाव निर्माण झाला. माळीवाडा व पठाण मोहल्ला दरम्यान झालेल्या तुफान दगडफेकीत बारा जण जखमी झाले. शिवसेना कार्यकर्त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली. त्यामुळे तणावाची स्थिती होती. अफवा व नागरिकांची पळापळ यामुळे काही काळ बाजारपेठ बंद झाली. जिल्हाधिकारी एस. पी. सिंह व पोलीस अधीक्षक अनंत रोकडे यांनी पाथरी शहराला भेट दिली. सायंकाळी शहरात तणावपूर्ण शांतता होती.
नामदेवनगर भागात नगरपालिकेचे डंपिंग ग्राऊंड आहेत. याच ठिकाणी पाच पांडवांचा ओटा व कळवातनीचा महाल असल्याचा सेनेचा दावा आहे, तर दुसऱ्या समाजाकडून येथे दर्गा असल्याचे सांगितले जाते. या ठिकाणी पालिकेच्या वतीने गेल्या आठवडय़ात संरक्षण िभत बांधण्याचे काम सुरू झाले, तेव्हा सेनेने प्रखर विरोध केला. त्यामुळे उपजिल्हाधिकारी ब्रीजेश पाटील यांनी संरक्षण िभतींचे काम थांबविले व जमावबंदी आदेश जारी केला. सोमवारी या जागेच्या वादासंबंधात पाटील यांच्या दालनात बठक घेण्यात आली. बठकीस आमदार बाबाजानी दुर्राणी व मीरा रेंगे, सेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. संजय कच्छवे, कल्याण रेंगे आदी उपस्थित होते.
बठकीदरम्यान उपजिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दोन्ही समाजांतील लोक मोठय़ा संख्येने जमा झाले. पाटील यांनी या ठिकाणी ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर गोंधळ निर्माण झाला. माळीवाडा व पठाण मोहल्लाच्या दरम्यान नेताजी सुभाषचंद्र शाळेसमोर एका गटाकडून तुफान दगडफेक झाली. दगडफेकीत बारा जण जखमी झाले. पकी ७ गंभीर जखमींना परभणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सेनेचे संजय कुलकर्णी यांच्या वाहनावर दगडफेक झाली.
हा गोंधळ चालू असताना शहरात अफवा पसरल्या. त्यामुळे क्षणार्धात बाजारपेठ बंद झाली. आमदार दुर्राणी व रेंगे यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यानंतर रात्री तणाव निवळला. दरम्यान, जिल्हाधिकारी सिंह व पोलीस अधीक्षक रोकडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. शहरात तणावपूर्ण शांतता आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Sep 2014 रोजी प्रकाशित
दगडफेकीच्या प्रकारानंतर पाथरीत तणावपूर्ण शांतता
पाथरी शहरात नामदेवनगरच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेवरील पाच पांडवांचा ओटा व दर्गा या वादातून सोमवारी दुपारी तणाव निर्माण झाला. माळीवाडा व पठाण मोहल्ला दरम्यान झालेल्या तुफान दगडफेकीत बारा जण जखमी झाले.
First published on: 02-09-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tenssion in pathari