अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. अमरावती विभागाचा निकाल ९६.८१ टक्के लागला असून नऊ विभागीय मंडळांमध्ये अमरावतीचे स्थान सातवे आहे.
वाशीम जिल्हा ९७.६२ टक्क्यांसह विभागात पहिला आला आहे. तर सर्वात कमी निकाल (९६.३१ टक्के) यवतमाळ जिल्ह्याचा आहे.

अमरावती जिल्ह्याचा निकाल ९६.३९, अकोला ९७.०४ तर बुलढाणा जिल्ह्याचा निकाल ९७.१६ टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच निकालात यशाचा ठसा उमटवला असून मुलींच्या निकालाची टक्केवारी ९७.९६ इतकी आहे़ मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.०६ इतकी आहे.
विभागीय मंडळामार्फत मार्च २०२२ मध्ये माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीची परीक्षा १५ मार्च ते ९ एप्रिलदरम्यान घेण्यात आली़

या परीक्षेकरिता अमरावती विभागातून १ लाख ५७ हजार ७५३ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यातील १ लाख ५५ हजार ४९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून यापैकी १ लाख ५० हजार ५४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालानंतर विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास त्यांना शिक्षण मंडळाकडून उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे़

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.