१४ वर्षाच्या मुलाने बिबट्याशी लढा देत आपल्या सात वर्षांच्या चुलत भावाचा जीव वाचवला आहे. मुलाने भावाला अक्षरक्ष: मृत्यूच्या जबड्यातून ओढून आणत जीवनदान दिलं. ठाण्यातील मुरबाड तालुक्यात अंगावर काटा आणणारी ही घटना घडली आहे. ही घटना समोर आल्यानंतर मुलाच्या धाडसाचं कौतुक होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुक्रवारी संध्याकाळी नरेश (१४) आणि चुलत भाऊ हर्षद (७) आपल्या आजीसोबत शेतात गेले होते. आजी शेतात व्यस्त असताना दोघेही जांभळांच्या शोधात निघाले. यावेळी बिबट्या एका घनदाट ठिकाणी लपून बसला होता. त्याने उडी मारुन नरेशवर हल्ल्याचा प्रयत्न केला. पण नरेश बाजूला झाल्याने त्याने हर्षदवर हल्ला करत त्याला जखमी केला. यावेळी नरेशने धाडस दाखवत काही दगड उचलले आणि तेथे पडलेली एक काठी उचलून बिबट्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. नरेशने केलेल्या हल्ल्यामुळे बिबट्याची हर्षदवरील पकड सैल पडली.

दोघा मुलांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केल्याने त्यांची आजी हातात कोयता घेऊन धावत तिथे पोहोचली. यावेळी बिबट्याने तेथून पळ काढला. आजीने दोन्ही मुलांना घेऊन रुग्णालय गाठलं. तिथे दोघांवर प्राथमिक उपचार करण्यात आले.

महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांनी वनविभागाला बिबट्या घटनास्थळापासून ३०० मीटर अंतरावर मृतावस्थेत आढळला. मादी बिबट्या १० ते १२ वर्षांची होती. शवविच्छेदनासाठी मृतदेह संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये नेण्यात आला आहे. बिबट्याच्या शरिरावर कोणत्याही जखमा नाहीत.

दरम्यान पोलिसांनी धाडस दाखवत भावाचा जीव वाचवणाऱ्या नरेशचा सत्कार केला आहे. इतक्या लहान वयात मुलाने दाखवलेल्या धाडसाचं करावं तितकं कौतुक कमीच आहे अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane 14 year old boy fight leopard saves cousin murbad kalyan sgy
First published on: 17-06-2019 at 13:18 IST