नाशिकमध्ये होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३, ४ व ५ डिसेंबरला होणार

स्वागताध्यक्ष मंत्री छगन भुजबळ यांनी दिली माहिती.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकहितवादी मंडळ, नाशिक आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ‘कुसुमाग्रज नगरी’, भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव नाशिक येथे दि. ३, ४ व ५ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे स्वागताध्यक्ष, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

लोकहितवादी मंडळ, नाशिक आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत माहिती देण्यासाठी आज भुजबळ फार्म कार्यालय नाशिक येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी स्वागताध्यक्ष छगन भुजबळ बोलत होते.

यावेळी निमंत्रक प्रमुख कार्यवाहक जयप्रकाश जातेगावकर, मुख्य समन्वयक विश्वास ठाकूर, सह कार्यवाहक मुकंद कुलकर्णी, कार्यवाह प्रा.डॉ. शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, सुभाष पाटील, सह कार्यवाह किरण समेळ, कार्यालयीन प्रमुख दिलीप साळवेकर, अमोल जोशी आदी उपस्थित होते.

संमेलन कधी घेता येईल यावरही विचार सुरु होता –

यावेळी भुजबळ म्हणाले की,”करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नाशिक मध्ये होणारे संमेलन स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर करोनाच्या संदर्भातील शासनासहीत सर्वांचे प्रयत्न निश्चितपणे कामी आले व मोठ्या प्रमाणावर या महामारीवर नियंत्रण मिळाले आहे असे सध्याचे वातावरण आहे. हळूहळू सर्वच व्यवहार सुरु करण्यासा शासनाने दिली साहजिकच नाशिकला होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कधी घेता येईल यावरही विचार सुरु होता. त्यानंतर एकूण परिस्थितीचा विचार करुन आणि संमेलनाध्यक्षांच्या सोयीचा विचार करता हे संमेलन नाशिक येथे दि. ३, ४ व ५ डिसेंबर २०२१ या काळात घेण्याचे ठरले आहे.”

या गोष्टींचा प्रामुख्याने विचार करण्यात आलेला आहे –

यावेळी निमंत्रक आणि प्रमुख कार्यवाहक जयप्रकाश जातेगावकर म्हणाले की,”आधीचे संमेलन गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात घेण्याचे ठरले होते आणि त्याची बरीच तयारीही झाली होती. परंतु कोरोनाची प्रार्दुभाव अजूनही असल्याने व शासनांच्या निर्बंधामुळे हे संमेलन व त्यातील विविध कार्यक्रम बंदिस्त सभागृहांमध्ये व्हावे यादृष्टीने विविध शैक्षणिक संस्थांचा विचार करण्यात आला. नाशिक शहरामधील वाहतुकीला कुठलीही अडचण न होता व संमेलनामध्ये अधिक चांगला आटोपशीरपणा यावा, सर्व पाहुण्यांची निवासाची व्यवस्था एकाच ठिकाणी व्हावी तसेच ग्रंथ प्रदर्शन, विविध कला प्रदर्शने, पार्किंगची सोय, येणे-जाणे सर्वांना सुकर होईल याचा प्रामुख्याने विचार करण्यात आलेला आहे. ”

संमेलनाचे उद्घाटन होण्यापूर्वी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन –

ते म्हणाले की, ‘भुजबळ नॉलेज सिटी’ येथे बंदिस्त सभागृहे, हॉस्टेल्स्, मोठे क्लासरुम्स्, प्रचंड मोठे पार्किंग लॉटस् व नाशिक शहराच्या जवळ असल्याने आदी वरील सर्व लक्षात घेतलेल्या बाबींची पूर्तता उत्तम प्रकारे होत असल्याने हे संमेलन आपण भुजबळ नॉलेज सिटी येथे घेत आहोत. यादृष्टीने संमेलनास्थळी येण्यासाठी व जाण्यासाठी आवश्यक अशी बस व्यवस्था आपण करणार आहोत. त्यामुळे नागरिकांना जाणे-येणे सहज शक्य होणार आहे. संमेलनामध्ये सुरुवाती पासून जे कार्यक्रम ठरले आहेत. त्यामध्ये कोणताही बदल असणार नाही. शुक्रवारी दि. ३ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी कुसुमाग्रज प्रतिष्ठान, टिळकवाडी येथून आपली दिंडी निघणार आहे आणि संमेलनस्थळी दिंडी पोहोचल्यावर सकाळी ११ वाजता ध्वजारोहण होईल. त्यानंतर संमेलनाचे उद्घाटन होण्यापूर्वी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होईल आणि नंतर संमेलनाचे उद्घाटन होईल. त्याचदिवशी रात्री निमंत्रित कवींचे काव्य संमेलन होणार आहे.

बाल साहित्य मेळाव्याचे उद्घाटन दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते –

त्यानंतर ज्येष्ठ प्रकाशक डॉ. रामदास भटकळ यांचा प्रातिनिधीक स्वरुपामध्ये सत्कार आणि प्रकट मुलाखत आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ लेखक व नाटककार श्री. मनोहर शहाणे यांचाही गौरव दि. ४ डिसेंबर २०२१ रोजी केला जाणार आहे. दि. ४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता’ बाल साहित्य मेळाव्याचे ‘ उद्घाटन दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते होणार आहे. याव्यतिरिक्त स्मृतीचित्रे – लक्ष्मीबाई टिळक यावर परिचर्चा तसेच कथाकथन आणि कोरानानंतरचे अर्थकारण आणि मराठी साहित्य व्यवहार, मराठी नाटक एक पाऊल पुढे दोन पावले मागे, शेतकऱ्यांची दुःस्थिती, ऑनलाईन वाचन- वाङ्मय विकासाला तारक की मारक, साहित्यनिर्मितीच्या कार्यशाळा गरज की थोतांड, गोदातिरीच्या संतांचे योगदान असे परिसंवाद होणार आहेत. शिवाय ‘ कविकट्टा ‘ हाही असणार आहे. तसेच नाशिकच्या कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन आणि नाशिकच्या लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन ही देखील आकर्षणे असणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल –

संमेलनपूर्व दि. २ डिसेंबर २०२९ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम संध्याकाळी संमेलनस्थळी होणार आहे. तसेच दि. ४ डिसेंबर २०२९ रोजी नाशिकमधील स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम व दि. ५ डिसेंबर २०२१ रोजी संमेलनाचा समारोप झाल्यावर देखील सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. संमेलनाचा समारोप दि. ५ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी होणार असून समस्त साहित्यिकांनी, साहित्यप्रेमींनी रसिकांनी आणि नाशिककरांनी मोठ्या संख्येने संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The 94th all india marathi sahitya sammelan to be held in nashik will be held on december 3 4 and 5 msr

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या