गेली अनेक शतके शेतीप्रधान म्हणून ओळखला जाणारा आपला देश नजीकच्याच काळात ‘आयटीप्रधान’ देश म्हणून पुढे येईल. त्याच्याच जोरावर सन २०४०च्या दशकापर्यंत आपण चीनच्याही पुढे जाऊ, असा विश्वास माहिती व तंत्रज्ञानातील शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी येथे व्यक्त केला.
जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू आर्ट्स, कॉमर्स व सायन्स महाविद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण स्नेहसंमेलन डॉ. भटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार झावरे होते. राज्य सरकारच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे, दीपलक्ष्मी म्हसे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्करराव झावरे, माजी प्राचार्य डॉ. खासेराव शितोळे आदी या वेळी उपस्थित होते.
डॉ. भटकर म्हणाले, अध्यात्म आणि विज्ञानाच्या जोरावर अन्य देशांच्या तुलनेत आपण अग्रेसर आहोत. याच भांडवलावर आगामी काळात जगाला ज्ञान देणारा देश म्हणूनच भारताची नवी ओळख रूढ होऊन आपण ख-या अर्थाने जगद्गुरू होऊ. देशात स्त्रीभ्रूणहत्या व महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढते आहे. मात्र येणारा काळ हा महिलांचाच असेल, याचे भान पुरुषांनी ठेवले पाहिजे. महाविद्यालयांमध्ये संशोधनावर भर देणे गरजेचे आहे. या महाविद्यालयातील १० हजार ८०० ही विद्यार्थिसंख्या विद्यापीठालाच साजेशी आहे, असे गौरवोद्गार डॉ. भटकर यांनी काढले.
सुरुवातीला डॉ. झावरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. नवनाथ येठेकर यांनी सूत्रसंचालन केले. विद्यापीठ प्रतिनिधी प्राजक्ता पवार हिचेही या वेळी भाषण झाले. प्रा. आर. जी. कोल्हे यांनी आभार मानले.