गौतम अदाणी प्रकरणावर पंतप्रधान का बोलत नाहीत? असा प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी उत्तर दिलं. त्यामध्ये त्यांनी पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या नावांचा उल्लेख करत काँग्रेसवर कडाडून टीका केली. या टीकेचा समाचार आता शिवसेनेने घेतला आहे. सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. किचड उनके पास था, मेरे पास गुलाल, जो भी जिसके पास था उसने दिया उछाल! असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले होते. याच वक्तव्याचा समाचार सामनाच्या अग्रलेखातून घेण्यात आला आहे.

काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत आणि गुरूवारी राज्यसभेत विरोधकांच्या टीकेचा समाचार घेत भाषण केले. त्या भाषणात त्यांनी अदाणीचा अ देखील उच्चारला नाही. काँग्रेस पक्ष, गांधी, नेहरू घराणे, आधीच्या काँग्रेस सरकारवरची टीका याभोवतीच मोदी यांचे भाषण फिरत राहिले. एके ठिकाणी त्यांनी चिखल आणि कमळ याचा उल्लेख केला. किचड उनके पास था, मेरे पास गुलाल! जो भी जिसके पास था उसने दिया उछाल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या शायराना अंदाजात सांगितले. तुम्ही जेवढा जास्त चिखल उडवाल तेवढे कमळ अधिक फुलेल या आशयाचं वाक्यही त्यांनी भाषणात वापरलं. त्यावरून सत्ताधारी खासदारांनी बाके वाजवली. देशभरात भक्तमंडळीही वाह मोदी म्हणत खुश झाले असतील. पण एका यमकापलिकडील गमकाचे काय?

तुमच्याकडे काय आहे चिखलच ना?

चिखल आणि कमळ हे तुम्ही बोललात ते यमक जुळवायला, टाळ्या वाजवायला ठीक आहे पण तुम्ही तुमच्या भाषणात गांधी नेहरू घराणे, काँग्रेस आणि आधीची काँग्रेस सरकारे यांच्याविषयी जे बोललात ते काय होते? तुमच्याजवळ गुलाल होता जो तुम्ही उधळला अशी बढाई मारलीत पण तुमच्या जवळही चिखलच होता तोच तुम्ही फेकला. काँग्रेस पक्षाच्या संदर्भात परकिय विद्यापीठात झालेल्या कुठल्या तरी संशोधनाचा तुम्ही केलेला उल्लेख हा कोणत्या गुलालाचा प्रकार होता? एकीकडे हिंदुस्थानाची उभारणी अनेक पिढ्यांच्या श्रमातून आणि घामातून झाली असे सांगायचे आणि दुसरीकडे आधीच्या सरकारांनी वाटोळे केले असे सांगायचे. पंडित नेहरू महान होते म्हणायचे आणि दुसरीकडे नेहरू गांधी घराण्याच्या नावाने बोटेही मोडायची. कलम ३७० वरून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यातही उभे करायचे.कलम ३७० चे लाभार्थी कोण होते हे सांगायला लावू नका असेही सांगायचे. ही धमकी देणं म्हणजे गुलाल उधळणं असेल तर प्रश्नच संपला. टीका- प्रत्युत्तरं ही लोकशाही व्यवस्थेचेच भाग आहेत. त्यामुळे शाब्दिक युद्धात गैर काहीच नाही. याआधीही सत्ताधारी विरूद्ध विरोधक यांच्यात टोकाची शाब्दिक युद्धं झालीच आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधींचा आत्तापर्यंत केलेला उपमर्द हा चिखलच

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून राहुल गांधी यांचा भाजपा समर्थकांनी केलेला उपमर्द, हेटाळणी याला चिखल नाही म्हणायचे तर काय म्हणायचे? गुरूवारच्या भाषणात एके ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की नेहरू जर महान होते तर त्यांच्या वारसांना नेहरू हे आडनाव लावण्याची लाज का वाटते? हा पण पंतप्रधांनांनी उधळलेला गुलाल होता का? अदाणी प्रकरणावरचं मौन हा तुम्हाला गुलाल वाटत असेल तर काय बोलायचे? केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून होणारी मुस्कटदाबी, इतर पक्षांना संपवण्याचे प्रयत्न हा तुमच्या हाती असलेला चिखलच आहेत. गुलाल आणि कमळ याचे यमक तुम्ही जुळवलेत. पण तुमचे पायही चिखलाचेच आहेत हे गमक विसरू नका असंही सामनाच्या अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे.