scorecardresearch

रेशीम उद्योगातून उन्नतीचा ‘धागा’!; अमरावतीत विदर्भातील पहिला रेशीम बाजार

विदर्भातील पहिला रेशीम बाजार अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बडनेरा उपबाजारात सुरू झाला आहे.

रेशीम उद्योगातून उन्नतीचा ‘धागा’!; अमरावतीत विदर्भातील पहिला रेशीम बाजार

पहिल्या दिवशी ६० हजार ६०० रुपयांचा उच्चांकी दर

अमरावती : विदर्भातील पहिला रेशीम बाजार अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बडनेरा उपबाजारात सुरू झाला आहे. व्यवहारांच्या पहिल्याच दिवशी रेशीम कोषांना ६० हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला आणि तब्बल पाच लाख रुपयांची उलाढाल झाली. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून रेशीम उत्पादक या बाजारात आले होते.

रेशीम उत्पादकांसाठी रेशीम कोष विक्री बाजाराचे उद्घाटन सोमवारी झाले. ही विदर्भातील पहिलीच रेशीम कोष बाजारपेठ आहे. पहिल्या दिवशी बाजारपेठेत ८२४ किलो कोषांची आवक झाली. त्याच्या विक्रीतून शेतकऱ्यांना ४ लाख ९९ हजार २०९ रुपये मिळाले. ब्राह्मणवाडा येथील सुनील विठ्ठल धावडे यांच्या कोषाला सर्वाधिक ६०६ रुपये प्रतिकिलो दर मिळाला. तर बाजार समितीला ५ हजार २२५ रुपयांचा उपकर प्राप्त झाला.

बुलढाणा, नरखेड, नेर, पुसद, महागाव, काटोल या ठिकाणांहून शेतकऱ्यांनी येथे कोष विक्रीसाठी आणले होते. तर नागपूर, अकोल्यापासून अगदी पश्चिम बंगालमधून व्यापारी खरेदीसाठी आले होते. हा बाजार आठवडय़ातील सोमवार व गुरुवार असे दोन दिवस सुरू राहणार आहे. यामुळे विभागात रेशीम शेतीला चालना मिळेल, असे कृषी सहसंचालक किसन मुळे म्हणाले.

महारेशीम अभियान

शेतकऱ्यांनी संबंधित जिल्हा कार्यालयाकडे नोंदणी करून रेशीम शेती सुरू करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मोठे रेल्वे स्थानक व त्या माध्यमातून दळणवळणाची सुविधा उपलब्ध असल्यामुळे बडनेरामध्ये रेशीम बाजारपेठ उत्तमरीत्या विकसित होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या