वाई : ट्रेकर्सना भुरळ घालणाऱ्या वासोटा या किल्ल्याची सफर अविस्मरणीय असते.पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला ऐतिहासिक वासोटा किल्ल्याचा ट्रेक शनिवार (दि २३) ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद झालेला हा ट्रेक सुरू होत असल्याने पर्यटक व ट्रेकर्स यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव क्षेत्रात वासोटा किल्ला वसलेला आहे. दुर्गम असलेला हा किल्ला व्याघ्रगड म्हणून ओळखला जातो.
कोयनेच्या शिवसागर जलाशयातील दीड तासांचा बोटीचा प्रवास, सभोवताली सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे राखीव जंगल, पशुपक्ष्यांचा मुक्त संचार अशा रम्य वातावरणात वासोट्याच्या पायथ्याला पोहोचता येते. बामणोली येथील भैरवनाथ बोट क्लबच्या माध्यमातून बोट सेवा उपलब्ध केली जाते. पायथ्याला पोहोचल्यानंतर वन विभागाची परवानगी व आवश्यक शुल्क भरून ट्रेकला सुरुवात होते. वासोट्याचे जंगल एवढे निबीड आहे, की इथं सूर्यकिरण ही जमिनीवर पोहोचत नाहीत. सूर्यकिरण मिळवण्यासाठी ताडमाड वाढलेले वृक्ष एकमेकांशी स्पर्धा करतात. मान उंच करून ही हे वृक्ष दिसत नाहीत. दीड तासाच्या चढाईनंतर किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचता येते. किल्ल्यावर शंकराचे एक प्राचीन मंदिर, हनुमान मंदिर, जुन्या वाड्याच्या पायाचे भक्कम अवशेष व बुरुज आढळतात.
किल्ले वासोटा किल्ल्याच्या पूर्वेला जुना वासोटा किल्ला आहे. जुना वासोटा किल्ल्याच्या डोंगरावरील एकावर एक असलेले कातळ खडकाचे, तर रचून झालेला बाबूकडा पाहताना मनाचा अक्षरश: थरकाप उडतो. या ठिकाणी दिलेल्या आवाजाचा प्रतिध्वनी पुन्हा-पुन्हा उमटतो. अशा या ऐतिहासिक वासोट्याचा ट्रेक चालू झाल्याने स्थानिकांसह व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या भागातील रोजगार व पर्यटन वाढीला चालना मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग प्रामुख्याने कैदी ठेवण्यासाठी केला गेला.
अतिवृष्टीमुळे वासोट्याच्या वाटा खूपच खराब झाल्या होत्या. या वाटा दुरुस्त केलेल्या आहेत. यावर्षी वासोट्याच्या शेजारील नागेश्वर हे ठिकाण वाट कोसळल्याने बंद ठेवणार आहोत. तेथील ओढ्याचा प्रवाह बदलला आहे. तसेच शनिवार व रविवार या दिवशी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता स्थानिक बोट क्लब ट्रेकर्स ग्रुप यांच्याशी बोलून मर्यादित लोकांना प्रवेश देण्याबाबत धोरण ठरविले जात आहे. प्लास्टिक कचरा प्रतिबंध, तसेच कोरोनाचे नियम पाळून शनिवारपासून वासोटा ट्रेक चालू करत आहोत.
-बी. डी. हसबनीस,
वनक्षेत्रपाल, वन्यजीव विभाग, बामणोली